शिव थापा, देवेंद्रो उपांत्यपूर्व फेरीत
By admin | Published: August 30, 2015 10:42 PM2015-08-30T22:42:32+5:302015-08-30T22:42:32+5:30
विद्यमान चॅम्पियन शिव थापा (५६ किलो) आणि गेल्या वेळेसचा रौप्यपदक विजेता एल. देवेंद्रो सिंह (४९ किलो) यांनी आज आशियाई बॉक्सिंग स्पर्धेत
बँकॉक : विद्यमान चॅम्पियन शिव थापा (५६ किलो) आणि गेल्या वेळेसचा रौप्यपदक विजेता एल. देवेंद्रो सिंह (४९ किलो) यांनी आज आशियाई बॉक्सिंग स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरी गाठली; परंतु गेल्या वेळेस रौप्यपदक जिंकणाऱ्या मनदीप जांगडा (६९ किलो) याचे आव्हान संपुष्टात आले.
शिवने प्री क्वॉर्टर फायनलमध्ये जॉर्डनच्या मोहम्मद अलवादी याचा ३-0 ने पराभव केला, तर देवेंद्रोने चीनच्याच जुनजुन याचा याच
फरकाने पराभव केला. तथापि, मनदीपला जपानच्या यासुहीरो सुजुकीकडून १-२ असा पराभव पत्करावा लागला.
भारताकडून दिवसाची सुरुवात देवेंद्रोने केली आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील विजेत्या या खेळाडूने प्रारंभापासूनच आक्रमक पावित्रा अवलंबला. त्याने प्रतिस्पर्ध्यांवर ठोशांचा वर्षाव करताना त्याला बॅकफूटवर ढकलले.
भारतीय मुष्टियोद्ध्याने पहिल्या फेरीत पूर्ण वर्चस्व राखले. त्याचा फायदा पुढील दोन्हीही फेरीत मिळाला. देवेंद्रोच्या या तडफदार कामगिरीमुळे प्रतिस्पर्धी खेळाडू शेवटपर्यंत सावरू शकला नाही.
शिवथापानेही चातुर्यपणे खेळ करताना जॉर्डनच्या प्रतिस्पर्ध्याविरुद्ध महत्त्वपूर्ण गुण वसूल केले. प्रत्युत्तरात हल्ला करण्याचे कसब असणाऱ्या या भारतीय मुष्टियोद्ध्याने प्रारंभी
हल्ला करताना प्रतिस्पर्ध्याला उचकवले. जॉर्डनच्या मुष्टियोद्ध्याने तिसऱ्या फेरीत मुसंडी मारण्याचा
पुरेपूर प्रयत्न केला व अखेरच्या ३0 सेकंद पूर्ण वर्चस्व राखले; परंतु तो भारतीय मुष्टियोद्ध्याची सुरुवातीची आघाडी कमी करू शकला नाही.
तथापि, मनदीपने निराशा केली. त्याला त्याच्यापेक्षा उंच असलेल्या प्रतिस्पर्ध्याचा सामना करावा लागला. यावर्षीच्या अर्जुन पुरस्कारप्राप्त खेळाडूला बचाव करताना केलेल्या चुकाही महागात पडल्या.
(वृत्तसंस्था)