शिव थापाला ‘टॉप’मधून वगळण्याची मागणी केली नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 01:12 AM2017-07-24T01:12:47+5:302017-07-24T01:12:47+5:30
राष्ट्रीय पर्यवेक्षकांच्या बैठकीमध्ये अव्वल पुुरुष बॉक्सर शिव थापाला टारगेट आॅलिम्पिक पोडियम (टॉप) योजनेतून वगळण्याची मागणी मी कधीच केली नाही,
नवी दिल्ली : राष्ट्रीय पर्यवेक्षकांच्या बैठकीमध्ये अव्वल पुुरुष बॉक्सर शिव थापाला टारगेट आॅलिम्पिक पोडियम (टॉप) योजनेतून वगळण्याची मागणी मी कधीच केली नाही, असे आॅलिम्पिक कांस्यपदक विजेती महिला बॉक्सर मेरीकोमने स्पष्ट केले.
मेरी म्हणाली, ‘शिव थापाची कारकीर्द संपलेली असून तो २०२० च्या टोकियो आॅलिम्पिकमध्ये काही करू शकणार नाही, असे मी म्हटल्याचे वृत्त चुकीचे आहे. शिवची कारकीर्द संपल्याची व त्याला टॉप योजनेतून वगळण्याचे मी कधीच म्हटलेले नाही. चुकीचे वक्तव्य प्रकाशित करून कसून मेहनत घेणाऱ्या बॉक्सरची प्रतिमा मलीन करणे, माझ्य मनाला पटत नाही.’
विश्व चॅम्पियनशिपसाठी तयारी करीत असलेला २३ वर्षीय थापा सध्या फ्रान्समध्ये सराव करीत आहे. त्याने ताश्कंद आशियाई चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक पटकावले आहे. ३० वर्षीय मनोज कुमारबाबत वक्तव्य केल्याचे वृत्त मेरीने फेटाळून लावले.
मेरी म्हणाली, ‘मी मनोज कुमारच्या वयाचा कधीच उल्लेख केलेला नाही. अशा प्रकारचे चुकीचे वृत्त प्रकाशित करणे खोडसाळपणाचे आहे. त्यामुळे खेळाडूंच्या प्रतिष्ठेला धक्का बसतो.’
क्रीडा मंत्रालयातर्फे बॉक्सिंगसाठी नियुक्त करण्यात आलेल्या दोन पर्यवेक्षकांमध्ये मेरीकोमचा समावेश आहे. अन्य पर्यवेक्षक राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता अखिल कुमार आहे. (वृत्तसंस्था)