शिव थापाची उपांत्य फेरीत धडक; अन्य सहा भारतीयांचीही आगेकूच
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2019 02:21 AM2019-10-30T02:21:10+5:302019-10-30T02:21:22+5:30
आशियाई क्रीडा स्पर्धेची माजी कांस्यपदक विजेती पूजा राणीची लढत ब्राझीलच्या बिटरिज सोरेसविरुद्ध होईल.
टोकियो : भारताचा स्टार बॉक्सर व चारवेळचा आशियाई चॅम्पियन शिव थापा (६३ किलो) याने मंगळवारी उपांत्यपूर्व फेरीत विजय मिळवत ऑलिम्पिक चाचणी स्पर्धेत आपले पदक निश्चित केले. त्याचवेळी दुसरीकडे, सहा अन्य भारतीय खेळाडूंनी रिंगमध्ये न उतरताच उपांत्य फेरी गाठली.
थापाने स्थानिक बॉक्सर युकी हिराकावाचा ५-० ने पराभव केला. आसामच्या या बॉक्सरने या महिन्याच्या सुरुवातीला आपले तिसरे राष्ट्रीय विजेतेपद पटकावले होते. उपांत्य फेरीत बुधवारी त्याची लढत जपानच्या देसुके नारिमात्सूविरुद्ध होईल. नारिमात्सूला पहिल्या फेरीत बाय मिळाला आहे.
निकहत झरीनसह (५१ किलो) सहा भारतीय खेळाडूंचे रिंगमध्ये न उतरताच पदक निश्चित झाले आहे. या सर्वांना पुढे चाल मिळाली आहे. झरीनव्यतिरिक्त सुमित सांगवान (९१ किलो), आशिष (६९ किलो), वनालिम्पुइया (७५ किलो), सिमरनजित कौर (६० किलो) आणि पूजा राणी (७५ किलो) यांनी उपांत्य फेरीत स्थान मिळवले. या महिन्याच्या सुरुवातीला राष्ट्रीय जेतेपद पटकावणाऱ्या सांगवानला कजाखस्तानच्या एबेक ओरलबेच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे, तर झरीनची लढत जपानच्या साना कवानोसोबत होईल. झरीन अलीकडेच एम. सी. मेरीकोमसोबत चाचणी लढत आयोजित करण्याच्या वृत्तामुळे चर्चेत होती. (वृत्तसंस्था)
आशियाई क्रीडा स्पर्धेची माजी कांस्यपदक विजेती पूजा राणीची लढत ब्राझीलच्या बिटरिज सोरेसविरुद्ध होईल. राणीने यंदा सुरुवातीला आशियन चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक पटकावले होते. भारताच्या केवळ एका बॉक्सरला अनंत चोपडे उपांत्यपूर्व फेरीच्या पुढे मजल मारता आली नाही. तो स्थानिक बॉक्सर तोशो काशिवसाकीविरुद्ध २-३ ने पराभूत झाला.