शिवशंकरचे विजेतेपद
By admin | Published: February 23, 2015 02:24 AM2015-02-23T02:24:59+5:302015-02-23T02:24:59+5:30
कल्याणच्या शिवशंकर संघाने स्पर्धेतील धडाकेबाज खेळ कायम राखताना अशोक मंडळाने (करीरोड) सुवर्ण महोत्सवानिमित्त
मुंबई : कल्याणच्या शिवशंकर संघाने स्पर्धेतील धडाकेबाज खेळ कायम राखताना अशोक मंडळाने (करीरोड) सुवर्ण महोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत शानदार विजेतेपद पटकावले. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या अंतिम सामन्यात शिवशंकरने बलाढ्य मुंबईच्या विजय नवनाथचे तगडे आव्हान ९-७ असे परतावून लावले.
ना.म. जोशी मार्ग येथील श्रमिक जिमखाना येथे पार पडलेल्या या स्पर्धेतील अंतिम सामन्यात सुरुवातीपासूनच दोन्ही संघांनी बचावावर अधिक भर दिली. पहिल्याच मिनिटाला शिवशंकरने गुणांचे खाते उघडताना जबरदस्त सुरुवात केली. या वेळी सामन्यात आक्रमक खेळ पाहण्यास मिळणार असे वाटत होते. तसेच यानंतर लगेच शिवशंकरच्या बचावपटूंनी नवनाथ संघाच्या आक्रमकाची पकड करून २-० अशी सुरुवात केली. यानंतर मात्र दोन्ही संघांनी कोणताही धोका न पत्करल्याने १० मिनिटांपर्यंत शिवशंकरची हीच आघाडी कायम राहिली. ११व्या मिनिटाला नवनाथच्या अनुभवी सुधीर वलखडेने यशस्वी चढाई केली. मध्यांतराला शिवशंकरकडे २-१ अशी आघाडी होती. दुसऱ्या सत्रात तरी आक्रमक खेळ पाहण्यास मिळेल अशी आशा प्रेक्षकांना होती. या वेळी पुन्हा एकदा सुधीरने एकाच चढाईत ३ गडी मारले आणि नवनाथला ४-३ असे आघाडीवर नेले. तर लगेच शिवशंकरच्या नीलेश साळुंखेने अप्रतिमरीत्या बोनस गुणासह सामना ४-४ असा बरोबरीत आणला. यानंतर नवनाथने ६-४ अशी आघाडी घेतली. मात्र शिवशंकरच्या सुरज बनसोडेने आक्रमक चढाई करताना जबरदस्त हनुमान उडी घेत एकाचवेळी ३ बळी घेत संघाचे विजेतेपद निश्चित केले. यामुळे दडपणाखाली आलेल्या नवनाथ संघाकडून चुका झाल्या व त्याचा अचूक फायदा उचलताना शिवशंकरने विजेतेपदाला गवसणी घातली. (क्रीडा प्रतिनिधी)