सिंधूचा निचाओनकडून धक्कादायक पराभव
By admin | Published: January 29, 2016 03:31 AM2016-01-29T03:31:48+5:302016-01-29T03:31:48+5:30
भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिला थायलंडच्या बिगर मानांकित निचाओन जिंदापोल हिच्याकडून पराभवाची चव चाखावी लागली. पुरुष गटात गतविजेता पी. कश्यप, अव्वल मानांकित श्रीकांत
लखनौ : भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिला थायलंडच्या बिगर मानांकित निचाओन जिंदापोल हिच्याकडून पराभवाची चव चाखावी लागली. पुरुष गटात गतविजेता पी. कश्यप, अव्वल मानांकित श्रीकांत यांनी आपली विजयी मालिका कायम ठेवली.
लखनौच्या बीबीडी अॅकॅडमीत सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय ग्रांप्री स्पर्धा सुरू आहे. जिंदापोलने ८८ मिनिटे चाललेल्या चुरशीच्या सामन्यांत सिंधूला १८-२१, २६-२४ व २१-१७ अशी मात केली. मलेशिया मास्टर्स किताब पटकावणाऱ्या सिंधूला पहिल्या गेमपासूनच जिंदापोलने कडवी झुंज दिली. मात्र, हा गेम तिने निसटत्या फरकाने जिंकला. दुसऱ्या गेममध्ये या थाई खेळाडूने सिंधूचे आव्हान परतावून लावत गेममध्ये १-१ बरोबरी साधली. तर, तिसऱ्या निर्णायक गेममध्ये ही लय कायम ठेवत जिंदापोलने हा गेम खिशात घालत विजय मिळविला.
पुरुष एकेरीत भारताच्या केपी कश्यपने चीनच्या झू सियूआन याला २१-१९, २१-११ असे नमवीत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. कश्यपला पहिल्या गेममध्ये सियूआन याच्याकडून कडवी झुंज मिळाली. मात्र, दुसऱ्या गेममध्ये त्याने सहज बाजी मारली. के. श्रीकांत याने मलेशियाच्या जैनुद्दीन इस्कंदर जुल्करनैन याला २१-९, २१-१२ असे नमविले.