धक्कादायक निकाल, अफगाणिस्तानचा वेस्ट इंडिजवर विजय
By admin | Published: March 27, 2016 06:18 PM2016-03-27T18:18:04+5:302016-03-27T18:32:04+5:30
आयसीसी टी-२० वर्ल्डकपमध्ये पहिल्या धक्कादायक निकालाची नोंद झाली आहे. नवख्या अफगाणिस्तानच्या संघाने बलाढय वेस्ट इंडिजवर सहा धावांनी विजय मिळवला.
Next
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. २७ - आयसीसी टी-२० वर्ल्डकपमध्ये पहिल्या धक्कादायक निकालाची नोंद झाली आहे. नवख्या अफगाणिस्तानच्या संघाने बलाढय वेस्ट इंडिजवर सहा धावांनी विजय मिळवला.
इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका यासारख्या बलाढय संघांवर विजय मिळवून दिमाखात उपांत्यफेरीत प्रवेश करणा-या वेस्ट इंडिजवर नवख्या अफगाणिस्तानसमोर पराभवाची नामुष्की ओढवली.
प्रथम फलंदाजी करणा-या अफगाणिस्तानने वीस षटकात सात बाद १२३ धावा करुन विजयासाठी १२४ धावांचे लक्ष्य दिले होते. वेस्ट इंडिजला निर्धारीत वीस षटकात आठ बाद ११७ धावांपर्यंत मजल मारता आली. शेवटच्या षटकात वेस्ट इंडिजला विजयासाठी १० धावांची आवश्यकता होती.
पण मोहोम्मद नाबीने हे षटक अप्रतिमरित्या टाकत फक्त तीन धावा देत एक विकेट घेतला. या निकालामुळे वेस्ट इंडिजच्या मार्गात अडथळे निर्माण होणार नसले तरी, अफगाणिस्तानसारख्या नवख्या संघाचा आत्मविश्वास मात्र वाढणार आहे.
अफगाणिस्तानकडून नजीबबुल्लाह झादराने सर्वाधिक नाबाद ४८ आणि सलामीवीर मोहोम्मद शहजादने २४ धावा केल्या. या दोघांच्या फलंदाजीच्या बळावर नागपूरच्या संथ खेळपट्टीवर अफगाणिस्तानने १२३ धावांचा टप्पा गाठला. वेस्ट इंडिजकडून ब्राव्होच्या २८ आणि चार्ल्सच्या २२ धावांचा अपवाद वगळता एकही फलंदाज आश्वासक फलंदाजी करु शकला नाही.