थायलंड ओपन बॅडमिंटन : रंकीरेड्डी-पोनप्पाचा धक्कादायक विजय
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2019 03:20 AM2019-08-01T03:20:39+5:302019-08-01T03:21:37+5:30
थायलंड ओपन बॅडमिंटन : किदाम्बी श्रीकांत दुसऱ्या फेरीत
बँकॉक : सात्त्विक साईराज रंकीरेड्डी- अश्विनी पोनप्पा जोडीने थायलंड ओपन बॅडमिंटनच्या मिश्र दुहेरीत बुधवारी सलामी लढतीत चान पेंग सून - गोह लियू यिंग या आॅलिम्पिक रौप्यपदक विजेत्या जोडीवर धक्कादायक मात करीत कारकिर्दीत सर्वांत मोठ्या विजयाची नोंद केली आहे.
भारताच्या या बिगर मानांकित जोडीने एक तास दोन मिनिटे चाललेल्या संघर्षात मलेशियाची सून - यिंग या पाचव्या मानांकित जोडीला २१-१८, १८-२१, २१-१७ ने धूळ चारली. जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर असलेल्या सून- यिंग यांच्यावर मात करण्याची पोनप्पा- रंकीरेड्डी यांची ही दुसरी वेळ आहे. २३ व्या स्थानावर असलेल्या भारताच्या या जोडीने मागच्या वर्षी राष्ट्रकुल स्पर्धेत मलेशियाच्या या जोडीवर मात केली होती.
पोनप्पा-रंकीरेड्डी यांचा सामना आता इंडोनेशियाची जोडी एलफियान एको- मार्शेला इस्लामी यांच्याविरुद्ध होईल. पाचवा मानांकित किदाम्बी श्रीकांत याने चीनचा नवखा खेळाडू रेन पेंग बो याचा कडव्या संघर्षात एक तास सात मिनिटांत २१-१३, १७-२१, २१-१९ ने पराभव केला. श्रीकांतची गाठ थायलंडचा खोसित फेतप्रदाब याच्याविरुद्ध पडेल. सौरभ वर्मा मात्र पहिल्याच सामन्यात पराभूत झाला. त्याने जपानचा प्रतिस्पर्धी कांटा सुनेयामा याच्याकडून २१-२३, २१-१९, ५-२१ असा पराभव पत्करावा लागला.
शुभंकर डे याला मात्र पहिल्या सामन्यात अव्वल मानांकित आणि नंबर वन जपानचा केंटो मोमोटो याच्याकडून पुढे चाल मिळाली. महिला एकेरीत साई उत्तेजिता राव ही चीनची जियाओ जिन हिच्यापुढे हतबल ठरली. उत्तेजिताचा १७-२१, ७-२१ ने पराभव झाला.