पिस्तुलात बिघाड होऊनही राही सरनोबतचा सुवर्णवेध, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत २५ मीटरमध्ये मारली बाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 16:30 IST2025-02-03T16:29:12+5:302025-02-03T16:30:21+5:30

राही जुलै २०२२ ते २०२३ या कालावधीत कोरोनामुळे नेमबाजीपासून होती दूर

Shooter Rahi Sarnobat won the gold medal in the 38th National Games | पिस्तुलात बिघाड होऊनही राही सरनोबतचा सुवर्णवेध, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत २५ मीटरमध्ये मारली बाजी

पिस्तुलात बिघाड होऊनही राही सरनोबतचा सुवर्णवेध, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत २५ मीटरमध्ये मारली बाजी

कोल्हापूर : कोल्हापूरची सुवर्णकन्या राही सरनोबतने ३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील सोनेरी वेध घेतला. सातव्या फेरीत राहीच्या पिस्तुलात बिघाड होऊनही संयमी खेळ करीत तिने सुवर्ण यशाचा अचूक निशाणा घेतला. २५ मीटर पिस्तूल प्रकारातील अंतिम लढतीत ३५ गुणांनी सुवर्ण पदकाचा वेध घेतला. डेहराडून येथे महाराणा प्रताप क्रीडा संकुलातील त्रिशूल शूटिंग रेंजमध्ये स्पर्धा सुरू आहे. सुवर्ण पदक घेत तिने शानदार पुनरागमन केले.

सुरुवातीला पिछाडीवर असलेल्या राही हिने चौथ्या फेरीपासून आघाडी घेतली. सातव्या फेरीत राहीच्या पिस्तुलात थोडासा तांत्रिक बिघाड झाला होता. त्याकडे दुर्लक्ष करीत तिने शेवटपर्यंत संयम दाखवित सुवर्ण पदकावर नाव कोरले. तांत्रिक बिघाडाच्या वेळी सिमरन हिने राही हिला मागे टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, राहीने दोन्ही नेम अचूक साधत विजयी आघाडी कायम ठेवली.

समरन प्रीत कौर ब्रार (पंजाब) आणि टी. एस. विद्या (कर्नाटक) यांनी अनुक्रमे रौप्य आणि कांस्य पदक पटकाविले. महाराष्ट्राच्या रिया थत्ते हिने चौथा क्रमांक पटकाविला.

राही जुलै २०२२ ते २०२३ या कालावधीत कोरोनामुळे नेमबाजीपासून दूर होती. त्यामुळे नेमबाजीतील कारकीर्द संपुष्टात येईल की काय, अशी भीती निर्माण झाली होती. मात्र ऑक्टोबर २०२३ पासून तिने काही वेळ सरावाला सुरुवात केली. २०२४ मध्ये ऑलिम्पिकमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, ही संधी वाया गेल्याने तंदुरुस्तीवर लक्ष केंद्रित केले.

ती सध्या पुणे येथील बालेवाडीत सराव करीत आहे. २०११ मध्ये रांची येथे झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत तिने पहिल्यांदा भाग घेतला. आय.एस. एस. एफ जागतिक चषक मालिकांत चार सुवर्ण, एक रौप्य, दोन कांस्य पदके तिने जिंकली. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत दोन सुवर्ण, एक रौप्य पटकाविले. आशियाई क्रीडा स्पर्धेत एक सुवर्ण, एक कांस्य पदकाची कमाई केली. तिने दोन वेळा ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व केले.

Web Title: Shooter Rahi Sarnobat won the gold medal in the 38th National Games

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.