'नेमबाजीतील यश 'पिरॅमिडल सपोर्ट स्ट्रक्चर' सिद्ध करते'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2024 08:55 AM2024-08-01T08:55:15+5:302024-08-01T08:55:23+5:30
पॅरिस ऑलिम्पिकमधील भारतीय नेमबाजांच्या कामगिरीने ते पुन्हा सिद्ध केले.
गगन नारंग थेट पॅरिसहून...
यशापेक्षा मोठे काहीही नसते. पॅरिस ऑलिम्पिकमधील भारतीय नेमबाजांच्या कामगिरीने ते पुन्हा सिद्ध केले. यावरून हे देखील सिद्ध होते की, खेळामध्ये बदल ही काळाची गरज आहे. २०२१ साली पदकाविना परतलेल्या नेमबाजांनी केवळ भारताच्या पदकाचे खातेच उघडले नाही, तर मनू भाकर आणि सरबजोत सिंग यांनी इतिहासही रचला. १२ वर्षांआधी आजच्याच दिवशी आम्ही नेमबाजीत आणखी एक पदक जिंकले याबद्दल मी वैयक्तिकरीत्या भावुक आहे.
तुम्ही हे वाचणार तेव्हा मनू कदाचित भारतासाठी तिसरे पदक जिंकण्याच्या मार्गावर असेल. अर्जुन बबुताचा उल्लेख करावाच लागेल. त्याला पदकाने थोडक्यात हुलकावणी दिली. त्याने सर्वोत्तम कामगिरी केली, मात्र तो म्हणतो त्याप्रमाणे कदाचित त्याचा दिवस नव्हता. मग यावेळी नेमके काय बदलले? माझ्या मनात काही गोष्टी येतात. 'पहिली गोष्ट म्हणजे तरुण नेमबाजांचा आत्मविश्वास.' स्पर्धेआधी क्रीडाग्राममध्ये मी खेळाडूंना भेटलो, मात्र पथकप्रमुख म्हणून नव्हे तर खेळाडू या नात्याने. त्यांच्यात आत्मविश्वास जाणवला. माझ्यासाठी तो हृदयस्पर्शी होता. वरिष्ठ या नात्याने त्यांना सल्ला दिला की, 'वर्तमान स्थितीवर लक्ष केंद्रित करा!'
२१ जणांच्या संघातील जे दहा जण २०१८ पासून खेलो इंडियाचे सदस्य आहेत, त्यांना टॉप्सच्या माध्यमातून उच्चदर्जाच्या सुविधा लाभल्या. इतर ११ जणांना टॉप्सचा पाठिंबा असल्याने प्रशिक्षणासाठी निधीची चणचण नाही.
खेळाडूंसाठी हा मोठा दिलासा असतो. त्यांना शंभर टक्के कामगिरीचा आत्मविश्वास लाभतो. शिवाय पंतप्रधानांपासून संपूर्ण देशाकडून लाभलेला पाठिंबा त्यांना देशासाठी कामगिरी करण्याची जाणीव करून देते. 'गेम चेंजर' ठरलेली दुसरी गोष्ट म्हणजे विदेशी प्रशिक्षण, अत्याधुनिक उपकरणांसह खेळाडूंच्या संपूर्ण गरजा पूर्ण व्हाव्यात यासाठी हितधारकांमध्ये असलेला समन्वय, पॅरिसमध्ये सर्वच खेळाडूंना सर्वकाही उपलब्ध करून देण्यात आले. ही प्रमाणित कार्यपद्धती फारच निर्णायक ठरत आहे.
ऑलिम्पिकच्या सुरुवातीला मिळालेली दोन पदके इतर सर्व खेळाडूंसाठी उत्तम प्रेरणादायी आहेतच, शिवाय मला खात्री आहे की आमचे खेळाडू पॅरिसमध्ये आतापर्यंतचे सर्वोत्तम ऑलिम्पिक खेळण्यासाठी सज्ज असल्याच्या निर्धाराने उतरतील.
(गगन नारंग हे ऑलिम्पिक कांस्यविजेते नेमबाज आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचे पथकप्रमुख आहेत.)