नेमबाजी विश्वचषक : रिझवीचा सुवर्णवेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 02:27 AM2018-03-05T02:27:27+5:302018-03-05T02:27:27+5:30
भारताचा नेमबाज शहजार रिझवी याने पहिल्या आयएसएसएफ नेमबाजी विश्वचषकात विक्रमी सुवर्णपदक जिंकले. जितू राय आणि मेहुली घोष यांना मात्र कांस्यवर समाधान मानावे लागले.
नवी दिल्ली - भारताचा नेमबाज शहजार रिझवी याने पहिल्या आयएसएसएफ नेमबाजी विश्वचषकात विक्रमी सुवर्णपदक जिंकले. जितू राय आणि मेहुली घोष यांना मात्र कांस्यवर समाधान मानावे लागले.
मूळचा मेरठचा असलेला रिझवी याने मेक्सिकोतील गुवादालाझारा शहरात सुरू असलेल्या या स्पर्धेच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारातील अंतिम फेरीत २४३.३ इतक्या विश्वविक्रमी गुणांची नोंद केली. सध्याचा आॅलिम्पिक चॅम्पियन जर्मनीचा ख्रिस्टियन रेट्झ याला त्याने मागे टाकले. दुसºया स्थानावर राहिलेल्या रेट्झला २३९.७ गुणांवर समाधान मानावे लागले.
आघाडीचा पिस्तूल नेमबाज जितू राय याने याच प्रकारात २१९ गुणांसह कांस्य जिंकले. भारताच्या तीन नेमबाजांनी सत्रातील पहिल्याच स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिली होती. ओमप्रकाश १९८.४ गुणांसह चौथ्या स्थानावर घसरला. मेहुलीनेदेखील १० मीटर एअर रायफल प्रकारात कांस्य जिंकले. त्याने २२८.४ गुणांची नोंद केली. या प्रकारातही तीन भारतीय नेमबाज अंतिम फेरीत पोहोचले होते. अंजुम मुदगिल २०८.६ गुणांसह चौथ्या तसेच अपूर्वी
चंदेला १४४.१ गुणांसह सातव्या स्थानावर राहिली. भारताने रविवारी पहिल्याच दिवशी एक सुवर्ण
आणि दोन कांस्यपदकांवर नाव कोरले. (वृत्तसंस्था)
एनआरएआयकडून नेमबाजांचे कौतुक
आयएसएसएफ नेमबाजी विश्वचषकात पहिल्या दिवशी तीन पदकांची कमाई करणाºया नेमबाजांचे राष्टÑीय रायफल संघाचे (एनआरएआय) अध्यक्ष रानिंदरसिंग यांनी कौतुक केले आहे. पहिल्याच सिनियर विश्वचषकात विक्रमी कामगिरीसह सुवर्णविजेत्या रिझवीच्या कामगिरीचे विशेष कौतुक करीत रानिंदर म्हणाले, ‘युवा खेळाडूंवर भरवसा दाखविण्याचे हे मोठे फळ आहे. मी आश्चर्यचकित झालो.’