कोरोनामुळे चीनसह सहा देशांची नेमबाजी विश्वचषकातून माघार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2020 02:07 AM2020-02-27T02:07:34+5:302020-02-27T02:08:21+5:30
आयएसएसएफ नेमबाजी; नवी दिल्लीत १५ मार्चपासून रंगणार स्पर्धा
नवी दिल्ली : कोरोना संक्रमणाच्या भीतीपोटी चीनसह सहा देशांनी येथे पुढील महिन्यात होणाऱ्या नेमबाजी विश्वचषकातून माघार घेतल्याची माहिती भारतीय राष्ट्रीय रायफल महासंघाने बुधवारी दिली. आयएसएसएफ नेमबाजी विश्वचषकाचे आयोजन येथील कर्णीसिंग नेमबाजी रेंजमध्ये १५ ते २६ मार्च या कालावधीत होणार आहे.
एनआरएआय अध्यक्ष रानिंदरसिंग यांनी सांगितले की, ‘काही देशांनी आधी खेळण्यास होकार दर्शविला होता, मात्र कोरोनाच्या भीतीपोटी त्यांच्या देशाच्या धोरणाचा भाग म्हणून माघार घेतली आहे. या देशांच्या शासनाने प्रवास करण्यावर बंदी घातली आहे. चीनमध्ये या संक्रमणाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर अन्य देशांमध्ये याचा प्रभाव पडू नये म्हणून चीनने माघार घेतली. तायवान, हाँगकाँग, मकाऊ, उत्तर कोरिया आणि तुर्कमेनिस्तान या देशांनीदेखील राष्ट्रीय धोरणानुसार माघार घेतली.’
पाकिस्तानचे नेमबाज स्वदेशात नव्या प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनात सरावात व्यस्त असल्याने पाक संघही सहभागी होणार नसल्याची माहिती रानिंदर यांनी दिली. मागच्या वर्षी विश्वचषकादरम्यान पाकच्या नेमबाजांना भारताचा व्हिसा नाकारण्यात आला होता. या कारणांमुळे भारताला काही काळासाठी आंतरराष्टÑीय स्पर्धेचे यजमानपद भूषविण्यापासून निलंबित करण्यात आले होते.
रानिंदर पुढे म्हणाले, ‘गेल्यावेळी जे घडले ते कारण वेगळे होते. मागच्या निर्णयाला आताच्या निर्णयाशी कृपया जोडू नका. पाकच्या दोन नेमबाजांनी पिस्तूल प्रकारात आॅलिम्पिकची पात्रता गाठली आहे. पाक नेमबाजी महासंघाचे उपाध्यक्ष जावेद लोधी यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचे दोन्ही नेमबाज विश्वचषकात सहभागी होण्याऐवजी नव्या प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनात आॅलिम्पिक तयारीत व्यस्त आहेत.’ (वृत्तसंस्था)
नेमबाजांना देशातच सराव करण्याची सूचना
कोरोनाचा धोका लक्षात घेत नेमबाजांना परदेशात सराव करण्याची परवानगी न देण्याचा निर्णय भारतीय राष्टÑीय नेमबाजी महासंघाने (एनआरएआय) घेतला आहे. आरोग्याशी संबंधित धोका न पत्करण्याची भूमिका कायम असल्याने गरज भासल्यास एप्रिलमध्ये होणाºया टोकियो आॅलिम्पिक परीक्षण स्पर्धेतूनही माघार घेण्यास मागेपुढे पाहणार नाही, असे महासंघाने म्हटले.
भारतीय नेमबाजांना १६ ते २६ एप्रिल या कालावधीत होणाºया आॅलिम्पिक परीक्षण स्पर्धेत सहभागी व्हायचे होते. रानिंदर सिंग म्हणाले की, ‘आम्ही परीक्षण स्पर्धेसाठी संघ निवडला खरा मात्र कुठलीही जोखीम पत्करणार नाही. संघात पुरुष आणि महिला खेळाडू असतील तरीही कोरोनाचा धोका लक्षात घेता पाठविण्याचा अंतिम निर्णय लवकरच घेण्यात येईल. मुलांना कुठल्याही परिस्थितीत टोकियोला पाठविणार नाही.’