आॅलिम्पिक महासंघाला कारणे दाखवा नोटीस

By admin | Published: December 29, 2016 01:23 AM2016-12-29T01:23:59+5:302016-12-29T01:23:59+5:30

वादाच्या भोवऱ्यात सापडलेले क्रीडा प्रशासक सुरेश कलमाडी यांनी बुधवारी भारतीय आॅलिम्पिक महासंघाचे आजीवन अध्यक्षपद स्वीकारण्यास नकार दिला, तर क्रीडा

Show cause notice to Olympic federation | आॅलिम्पिक महासंघाला कारणे दाखवा नोटीस

आॅलिम्पिक महासंघाला कारणे दाखवा नोटीस

Next

नवी दिल्ली : वादाच्या भोवऱ्यात सापडलेले क्रीडा प्रशासक सुरेश कलमाडी यांनी बुधवारी भारतीय आॅलिम्पिक महासंघाचे आजीवन अध्यक्षपद स्वीकारण्यास नकार दिला, तर क्रीडा मंत्रालयाने आयओएला या वादग्रस्त निर्णयासाठी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
कलमाडी यांनी आयओएचे अध्यक्ष एन. रामचंद्रन यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, ‘माझी आजीवन अध्यक्षपदी निवड करणाऱ्या भारतीय आॅलिम्पिक महासंघाचे आभार व्यक्त करतो, पण यावेळी हा सन्मान स्वीकारणे योग्य ठरणार नाही. मला क्लीन चिट मिळेल, असा मला विश्वास आहे, पण तोपर्यंत या सन्मानाचा स्वीकार करू शकत नाही.’ कलमाडी आणि अन्य एक वादग्रस्त माजी अध्यक्ष अभय सिंग चौटाला यांची मंगळवारी आयओएच्या चेन्नईमध्ये झालेल्या वार्षिक आमसभेमध्ये आजीवन अध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यानंतर वाद निर्माण झाला आणि मंत्रालयाने बुधवारी आयओएला कारणे दाखवा नोटीस बजावताना ताकीद दिली की, या दोघांना हटविल्याशिवाय किंवा त्यांनी राजीनामा दिल्याशिवाय आयओएसोबत कुठलेही संबंध ठेवण्यात येणार नाही.
क्रीडामंत्री विजय यांना पत्रकारांसोबत बोलताना सांगितले की, ‘आयओएच्या वार्षिक आमसभेमध्ये या दोघांची आजीवन अध्यक्षपदी निवड करणे घटनाविरोधी असून मंत्रलायाला स्वीकारार्ह नाही. दोघांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. या दोघांच्या निवडीमुळे मी निराश आहे. जोपर्यंत त्यांना वगळण्यात येत नाही किंवा ते राजीनामा देत नाही तोपर्यंत मंत्रालय आयओएसोबत कुठल्याही प्रकारचे संबंध ठेवणार नाही.’
गोयल पुढे म्हणाले, ‘आयओए अशाप्रकारचे निर्णय घेणार असेल तर सरकारला विचार करावा लागेल. या निर्णयाचा चुकीचा संदेश गेला असून लोक नाराज झाले आहेत. आम्ही खेळामध्ये पारदर्शिता, सुशासन आणण्याचा प्रयत्न करीत असून, सर्व क्रीडा महासंघांनी आचारसंहितेचे पालन करायला हवे.’
दरम्यान, आयओएचे उपाध्यक्ष आणि आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे अध्यक्ष नरिंदर बत्रा यांना या निर्णयावर टीका केली असून दोघांनी पदाचा त्याग करावा, असे आवाहन केले.
बत्रा म्हणाले, ‘मी लवकरच आयओएचा राजीनामा देणार आहे. कारण सुशासन नसलेल्या संघटनेसोबत जुळून राहण्यास कुठले स्वारस्य नाही. क्लीन चिट मिळेपर्यंत या दोघांनी कुठलेही पद स्वीकारू नये, असे मी आवाहन करतो. प्रत्येकाचा एक काळ असतो. त्यानंतर त्याला पद सोडावे लागते. कुणीच संघटनेवर नेहमीसाठी राहू शकत नाही. त्यामुळे विदेशात भारताची प्रतिमा मलीन होते. तेथे सुशासन आणि पारदर्शिता यावर लक्ष केंद्रित करण्यात येते.’
दरम्यान, माजी क्रीडामंत्री अजय माकन यांनी आयओएचा निर्णय दु:खद व वेदनादायी असल्याचे म्हटले आहे. माकन म्हणाले, ‘माजी क्रीडामंत्री व खेळाचा चाहता असल्यामुळे कलमाडी व चौटाला यांची आयओएच्या आजीवन अध्यक्षपदी निवड करण्याच्या निर्णयाची निंदा करतो. या निर्णयाविरुद्ध कडक कारवाई करण्यात यावी, असे निवदेन क्रीडामंत्र्यांना देणार आहे. सर्व क्रीडा महासंघाने मंत्रालयातर्फे अनुदान मिळते. त्यामुळे सरकारने आपल्या अधिकाराचा वापर करायला हवा.’
माकन यांनी भाजपा खासदान अनुराग ठाकूर, शिरोमणी अकाली दलाचे खासदार सुखदेवसिंग ढिंढसा, आयओएचे सध्याचे उपाध्यक्ष तरलोचन सिंग यांनाही या निर्णयाचा विरोध न केल्यामुळे दोषी धरले. (वृत्तसंस्था)

चौटाला यांची वादग्रस्त कारकिर्द
चौटाला डिसेंबर २०१२ ते फेब्रुवारी २०१४ या कालावधीत आयओएचे अध्यक्ष होते. आरोपपत्र असलेल्या उमेदवाराची निवड करण्यात आल्याचा ठपका ठेवत, आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक समितीने राष्ट्रीय आॅलिम्पिक संघटनेवर निलंबनाची कारवाई केली होती. आयओसीने त्यानंतर आयओएच्या अध्यक्षपदी चौटाला यांची निवड रद्द ठरविली होती.

‘क्रीडामंत्री विजय गोयल यांच्या प्रतिक्रियेचे आश्चर्य वाटले. त्यांचा दावा आहे की, माझ्याविरुद्ध गुन्हेगारी व भ्रष्टाचाराचे प्रकरण आहे. माझ्याविरुद्ध कुठल्याही गुन्ह्याचे प्रकरण नसून, हे सर्व राजकीय प्रकरणे आहेत. भारतात आॅलिम्पिक खेळासाठी मोठी मेहनत घेतल्यामुळे मी या पदाचा दावेदार आहे.’- अभय सिंग चौटाला

Web Title: Show cause notice to Olympic federation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.