ठाण्यात श्री मावळी मंडळ राज्यस्तरीय भव्य कबड्डी स्पर्धेला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2023 04:05 PM2023-04-18T16:05:45+5:302023-04-18T16:06:57+5:30
महिला गटातील उद्घाटनाच्या सामन्यात ठाण्याच्या जिजाई क्रीडा मंडळ या संघाने अतिशय अटीतटीच्या झालेल्या सामन्यात कल्याणच्या नवतरुण क्रीडा मंडळ संघाचा ३४-३३ असा १ गुणांनी पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.
- विशाल हळदे
ठाणे : श्री मावळी मंडळ आयोजित ९८ व्या शिवजयंतीउत्सवानिमित्त ७० व्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन मावळी मंडळाच्या भव्य क्रीडा नगरीत झाले. सदर स्पर्धेच्या उद्घाटन सामन्यात महिला गटात जिजाई क्रीडा मंडळ ठाणे, माऊली प्रतिष्ठान मुंबई उपनगर, शिवशक्ती महिला संघ मुंबई शहर व जय भारत स्पोर्ट्स क्लब ठाणे या संघानी विजयी सलामी दिली. तर, पुरुष गटात ओम वर्तक नगर स्पोर्ट्स क्लब ठाणे, संघर्ष क्रीडा मंडळ मुंबई उपनगर, सागर क्रीडा मंडळ मुंबई उपनगर, ओवळी क्रीडा मंडळ मुंबई उपनगर, विश्वरूप क्रीडा मंडळ ठाणे, सुरक्षा प्रबोधिनी मुंबई उपनगर या संघानी दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.
महिला गटातील उद्घाटनाच्या सामन्यात ठाण्याच्या जिजाई क्रीडा मंडळ या संघाने अतिशय अटीतटीच्या झालेल्या सामन्यात कल्याणच्या नवतरुण क्रीडा मंडळ संघाचा ३४-३३ असा १ गुणांनी पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. सदर सामन्यात मध्यंतराला नवतरुण क्रीडा मंडळ संघाकडे १५-१३ अशी २ गुणांची आघाडी होती. उत्तरार्धात जिजाई क्रीडा मंडळ संघाने अतिशय आक्रमक खेळ करीत आपल्या संघाची गुणसंख्या वाढवली. मना संपायला १ मिनिट शिल्लक असताना जिजाई क्रीडा मंडळ या संघाकडे २ गुणाची आघाडी होती. नवतरुण क्रीडा मंडळाची शेवटची चढाई तेजश्री यादव हिने केली व आपल्या संघाला २ गुण मिळवून दिले व सामना समसमान गुणांवर आणला . परंतु जिजाई क्रीडा मंडळ संघाच्या संगम यादव हिने चलाखीने खेळ करून सामना १ गुणांनी जिंकला.
महिला गटातील दुसऱ्या सामन्यात ठाण्याच्या जय भारत स्पोर्ट्स क्लब या संघाने मुंबई उपनगरच्या रेल्वे लाईन पोलीस गर्ल ह्या संघाचा ३७-२९ असा ८ गुणांनी पराभव केला . सदर सामन्यात मध्यांतराला २१-११ अशी १० गुणांची आघाडी होती ती समृद्धी म्हांगडे हिच्या उत्कुष्ट पकडी व तिला चढाई मध्ये सायली बामणे हिने दिलेली उत्तम साथ. परंतु मध्यांतरानंतर रेल्वे लाईन पोलीस गर्ल ह्या संघाच्या वैशाली महाडिक हिने खोलवर चढाया करीत आपल्या संघाची गुणसंख्या वाढवली. पण तिची एकाकी लढाई आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही.पुरुष गटातील उदघाटणीय सामन्यात मुंबई उपनगरच्या संघर्ष क्रीडा मंडळाने कल्याणच्या श्री हनुमान सेवा मंडळाचा ३१-१६ असा १५ गुणांनी पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.
मध्यंतराला संघर्ष क्रीडा मंडळाकडे ९-७ अशी २ गुणांची नाममात्र आघाडी होती. परंतु मध्यंतरानंतर रोशन बैंकेट , शुभम लोकम यांच्या खोलवर चढायांमुळे. सदर सामना हा एकतर्फी झाला.पुरुष गटातील दुसऱ्या सामन्यात मुंबई उपनगरच्या सत्यम सेवा संघाने ठाण्याच्या होतकरु मित्र मंडळ संघाचा रोमहर्षक सामन्यात २५-२४ असा १ गुणांनी पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. सदर सामन्यात मध्यंतराला दोन्ही संघाचे १४-१४ असे समसमान गुण होते. उत्तरार्धात होतकरूच्या अनिकेत पवार याने अतिशय सुंदर पकडी करीत आपल्या संघाची गुणसंख्या वाढवली. तर, सत्यम सेवा संघाच्या साहिल नालावडेने उकृष्ट चढाया करीत आपल्या संघाला गुण मिळवून दिले. सामना शेवटच्या चढाईपर्यंत दोलायमान स्थितीत होता.परंतु शेवटच्या चढाईत साहिल नलावडेने मिळवलेल्या गुणांनी आपल्या संघास विजय मिळवून दिला.