श्रेयसीला रौप्य पदक
By admin | Published: July 28, 2014 03:35 AM2014-07-28T03:35:54+5:302014-07-28T03:35:54+5:30
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत नेमबाज आणि वेटलिफ्टिंगमध्ये पदकांची संख्या वाढवताना जोरदार धमाका केला.
ग्लास्गो : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत नेमबाज आणि वेटलिफ्टिंगमध्ये पदकांची संख्या वाढवताना जोरदार धमाका केला. काल, शनिवारी रात्री कोल्हापूरच्या राही सरनोबतने २५ मी. पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक पटकावल्यानंतर रविवारी श्रेयसी सिंगने महिलांच्या डबल ट्रॅप स्पर्धेत रौप्यपदकाचा मान मिळविला. उत्तर प्रदेशच्या २६ वर्षीय असाबने पुरुषांच्या डबल ट्रॅब नेमबाजीत कांस्यपदक आपल्या नावावर केले. शनिवारी रात्री उशिरा ओमकार ओतारीने वेटलिफ्टिंगमध्ये पुरुषांच्या ६९ किलो वजनगटात कांस्यपदक पटकावले. वैयक्तिक प्रकारात पदकांची लूट सुरू असताना मैदानी खेळात मात्र भारताचा दिवस संमिश्र ठरला. स्टार खेळाडू पी. व्ही. सिंधूच्या पराभवानंतरही भारताने कॅनडावर ३-१ने मात करीत मिश्र सांघिक बॅडमिंटन क्रीडा प्रकारात उपांत्य फेरी गाठली. सौरभ घोषालने स्क्वॅशमध्ये एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली. दीपिका पल्लीकलला मात्र महिलांच्या एकेरीमध्ये उपांत्यपूर्व फेरीत पराभव स्वीकारावा लागला. भारताने आतापर्यंत एकूण १९ पदकांची कमाई केली असून त्यात नेमबाजांनी सर्वाधिक ९ पदके पटकाविली आहे.
भारताच्या खात्यावर २० पदकांची नोंद असून त्यात ५ सुवर्ण, ८ रौप्य व ६ कांस्यपदकांचा समावेश आहे. (वृत्तसंस्था)