नेमबाजीत श्रेयसीचा ‘सुवर्णवेध’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 03:35 AM2018-04-12T03:35:04+5:302018-04-12T03:35:04+5:30

राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय खेळाडूंची घोडदौड सातव्या दिवशीही कायम राहिली. महिलांच्या डबल ट्रॅप नेमबाजी प्रकारात बुधवारी भारताला ‘सुवर्ण’ यश मिळाले.

Shreyasi's 'Golden Holes' in Shooting | नेमबाजीत श्रेयसीचा ‘सुवर्णवेध’

नेमबाजीत श्रेयसीचा ‘सुवर्णवेध’

Next

गोल्ड कोस्ट : राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय खेळाडूंची घोडदौड सातव्या दिवशीही कायम राहिली. महिलांच्या डबल ट्रॅप नेमबाजी प्रकारात बुधवारी भारताला ‘सुवर्ण’ यश मिळाले. २६ वर्षांची नेमबाज श्रेयसी सिंग हिने करिअरमधील सर्वोत्तम कामगिरी करीत सुवर्णपदकाची कमाई केली.
२०१४ साली ग्लास्गोमध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक पटकावलेल्या श्रेयसी सिंग हिच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष होते. श्रेयसीच्या सुवर्ण कामगिरीमुळे भारतीयांचा आनंद द्विगुणित झाला.
दुसरीकडे याच स्पर्धेत २३ वर्षांची वर्षा वर्मन हिचे मात्र कांस्य हुकले. वर्षाला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. माजी केंद्रीय मंत्री दिवंगत दिग्विजयसिंग यांची कन्या असलेल्या बिहारच्या श्रेयसीने पहिल्या फेरीपासूनच दबदबा कायम ठेवून २४, २५, २२ आणि २५ अशा गुणांसह अव्वल स्थान पटकविले. श्रेयसीच्या पदकानंतर १२ सुवर्ण, चार रौप्य आणि आठ कांस्यपदकांसह राष्ट्रकुलमध्ये भारताच्या पदकांची संख्या आता २४ वर पोहोचली आहे. (वृत्तसंस्था)
>ओम मिठरवालने ५० मीटर एअर पिस्तूल प्रकारात कांस्यपदकाची कमाई केली तर अंकुर मित्तलनेही कांस्य जिंकले. ५० मीटर पिस्तूल फायनलमध्ये जितू राय आठव्या स्थानावर घसरला. पुढील दोन दिवसांत बॉक्सिंगमधील पदके निश्चित होतील. बॉक्सिंगमध्ये मेरीकोमने ४८ किलो गटात अंतिम फेरीत धडक दिली, तर आठ पुरुष बॉक्सर उपांत्य फेरीत दाखल झाले.
हॉकीत भारताने ब गटात इंग्लंडला धूळ चारली.
बॅडमिंटनच्या एकेरीत पी. व्ही. सिंधू, सायना नेहवाल आणि के. श्रीकांत यांनी सुरुवातीचे सामने जिंकून कूच केली.
टेबल टेनिस आणि स्क्वॅशमध्ये एकेरी आणि दुहेरी लढती जिंकून उपांत्यपूर्व फेरीकडे वाटचाल केली.
अ‍ॅथलेटिक्समध्ये मात्र घोर निराशा झाली.
उंच उडीत तेजस्विनी शंकर २.२७ मीटरसह सहाव्या स्थानावर घसरली. हिमा दास महिलांच्या ४०० मीटर दौडमध्ये सहाव्या स्थानावर राहिली.
>श्रेयसीची जडणघडण घरातूनच...
राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण जिंकणारी श्रेयसी सिंग देशातील सर्वोत्तम डबल ट्रॅप नेमबाजांपैकी एक मानली जाते. श्रेयसीने आज ९६ गुणांसह ‘शूट आॅफ’मध्ये बाजी मारली. श्रेयसीमुळे देशाला सातव्या दिवशी पहिले सुवर्ण मिळाले. २६ वर्षीय श्रेयसीला तिच्या घरातूनच नेमबाजीचे बाळकडू मिळाले. श्रेयसीचे आजोबा कुमार नरेंद्रसिंग आणि वडील दिग्विजयसिंग राष्ट्रीय रायफल असोसिएशनचे अध्यक्ष राहिलेले आहेत. दिग्विजय हे पाच वेळा खासदार होते. २०१० मध्ये श्रेयसीने दिल्ली राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व केले, पण अपयशी ठरली.
२०१३ मध्ये मेक्सिकोतील नेमबाजी विश्वचषकात श्रेयसीला १५ व्या स्थानावर समाधान मानावे लागले. ग्लासगो राष्ट्रकुलमध्ये डबल ट्रॅप प्रकारात श्रेयसीला रौप्यपदक मिळाले.
२०१४ च्या इंचियोन आशियाडमध्ये ती कांस्यविजेती राहिली. २०१७ च्या राष्ट्रकुल नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदक जिंकणाऱ्या श्रेयसीने रौप्यपदकाचे रूपांतर सुवर्णपदकात केले.
>हे पदक ‘माईलस्टोन’...
हे सुवर्ण माझ्यासाठी ‘माईलस्टोन’ सिद्ध होणार आहे. २०१० मध्ये वडिलांच्या निधनामुळे मला माघार घ्यावी लागली. करिअरमधील हे सर्वांत मोठे पदक आहे. २०२२ च्या राष्टÑकुलमध्ये नेमबाजीचा समावेश नसेल, यासाठीही पदक विशेष आहे. हे पदक मला दीर्घकाळ प्रेरणा देत राहील. मी नर्व्हस होते; पण आत्मविश्वास ढळू दिला नाही. कुठल्याही स्थितीत माघार घ्यायची नाही, असा विश्वास असल्याने आव्हान स्वीकारण्यास सज्ज होते. - श्रेयसी सिंग, सुवर्णविजेती नेमबाज.

Web Title: Shreyasi's 'Golden Holes' in Shooting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.