टोकिओ ऑलिम्पिक रद्द करण्यासाठी स्वाक्षरी मोहीम !
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2021 01:49 AM2021-05-07T01:49:33+5:302021-05-07T01:50:10+5:30
टोकिओ ऑलिम्पिक रद्द करण्यासाठी स्वाक्षरी मोहीम !
टोकिओ : अख्खे विश्व कोरोनाच्या दहशतीखाली असल्यामुळे आगामी २३ जुलैपासून जपानमध्ये आयोजित टोकिओ ऑलिम्पिक रद्द करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. काही दिवआंआधी सुरू करण्यात आलेल्या ऑनलाइन याचिकेवर हजारो लोकांनी स्वाक्षरी करीत पाठिंबा दर्शविला.
टोकिओ, ओसाका आणि अन्य काही शहरांत कोरोनामुळे ११ मेपर्यंत आणीबाणी लागू करण्यात आली आहे. मागच्या वर्षी वाढत्या कोरोनामुळे ऑलिम्पिक लांबणीवर टाकण्यात आले आहे.
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाक यांना उद्देशून ही ऑनलाइन याचिका राबविण्यात येत आहे. बाक हे या महिन्याअखेर जपानच्या भेटीवर येणार आहेत. १७ मे रोजी हिरोशिमा येथे ऑलिम्पिक रिलेचा प्रवास पूर्ण होत असून त्यानिमित्त आयोजित सोहळ्याला ते उपस्थित राहतील. त्यानंतर ते टोकिओला भेट देतील. या शहरात ऑलिम्पिक रद्द करण्यासाठी अनेक गटांनी निदर्शने करण्याची योजना आखली आहे. टोकिओच्या गर्व्हनरपदासाठी अनेकदा निवडणूक लढविणारे केंजी उत्सुनोमिया यांनी ही विरोध मोहीम राबविली असून मोहीम सुरू होताच पहिल्या २४ तासांत जवळपास ५० हजार लोकांनी स्वाक्षरी केली.
उत्सेनोमिया म्हणाले, ‘कोरोना रोखण्याच्या उपाययोजनांकडे डोळेझाक करीत सरकार ऑलिम्पिक डोळ्यापुढे ठेवून योजना तयार करीत आहे. सरकारच्या या धोरणाला आमचा विरोध आहे. इस्पितळात जागा नसल्यामुळे लोक घरातच प्राण सोडत आहेत. देशातील नागरिकांच्या आरोग्य आणि सुरक्षेला प्राधान्य देण्याऐवजी ऑलिम्पिकचे आयोजन सरकारसाठी महत्त्वाचे झाले आहे काय?