चिनी भिंतीपलीकडचे खुणावणारे यश

By admin | Published: July 21, 2016 06:05 AM2016-07-21T06:05:24+5:302016-07-21T06:05:24+5:30

आॅलिम्पिक स्पर्धा जसजशी जवळ येत आहे, तसतसे भारताच्या पदकाविषयी अनेक चर्चा रंगत आहेत.

Significant achievements of Chinese walls | चिनी भिंतीपलीकडचे खुणावणारे यश

चिनी भिंतीपलीकडचे खुणावणारे यश

Next


आॅलिम्पिक स्पर्धा जसजशी जवळ येत आहे, तसतसे भारताच्या पदकाविषयी अनेक चर्चा रंगत आहेत. यामध्ये सर्वाधिक चर्चेचा खेळ आहे तो बॅडमिंटन. त्यात भारताची ‘फुलराणी’ सायना नेहवालची चर्चा सर्वांत जास्त आहे, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. २०१२च्या लंडन आॅलिम्पिकमध्ये सायनाने ब्राँझ मेडल आॅलिम्पिक पदक पटकावणारी पहिली भारतीय बॅडमिंटनपटू म्हणून इतिहास नोंदविला. साहजिकच या वेळी तिच्याकडून याहून अधिक चांगल्या कामगिरीची अपेक्षा होत आहे.
प्रकाश पदुकोण व पुल्लेला गोपीचंद यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर तिरंगा फडकावल्यानंतर अपर्णा पोपटने आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या तुलनेत राष्ट्रीय स्पर्धांत सातत्यपूर्ण कामगिरी करताना भारतात बॅडमिंटनच्या प्रसारासाठी मोलाचे योगदान दिले. मात्र, सायनाचा उदय झाल्यानंतर भारतात बॅडमिंटनची वेगळीच क्रेझ निर्माण झाली. सचिन तेंडुलकर, लिएंडर पेस, बायचुंग भुतिया, विश्वनाथन आनंद आणि सानिया मिर्झा अशा आघाडीच्या खेळाडूंसह देशात सायनाचीही चर्चा होऊ लागली. सायना एकामागोमाग एक आंतरराष्ट्रीय स्पर्धांत बॅडमिंटनमध्ये वर्चस्व असलेल्या चिनी ड्रॅगनला आव्हान देत असतानाच तिच्या जोडीला पी. व्ही. सिंधू, ज्वाला गुट्टा, अश्विनी पोनप्पा, पारुपल्ली कश्यप, किदाम्बी श्रीकांत, मनू अत्री, बी. सुमीत रेट्टी, अजय जयराम, एचएस प्रणय अशी युवा; परंतु मजबूत फळी निर्माण झाली आणि भारतात बॅडमिंटनने चांगलाच जम बसवला. गोपीचंद यांनी निवृत्तीनंतर युवा शटलर्स शोधण्यासाठी घेतलेली मेहनत आज रंग दाखवू लागली आहे. रिओ आॅलिम्पिकसाठी पात्र ठरलेले सर्व शटलर्स गोपीचंद यांच्या हाताखालीच घडले. पदकांचा विचार केल्यास भारताची सर्वाधिक आशा सायनावरच आहेत. मात्र, त्याचबरोबर पी. व्ही. सिंधू, ज्वाला-अश्विनी, के. श्रीकांत आणि मनू अत्री-बी. सुमन रेड्डी यांच्याकडूनही चमत्कार घडू शकतो. महिला एकेरीत सायनासह सिंधूने आपले वेगळे स्थान निर्माण केले असून जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत तिने दोनवेळा पदक पटकावून आपली दखल घेण्यास भाग पाडले आहे.
तसेच, श्रीकांतनेही यंदाच्या वर्षी झालेल्या आशियाई स्पर्धेत कांस्य आणि दक्षिण आशियाई स्पर्धेत पुरुष व दुहेरीत सुवर्ण अशी तीन पदके पटकावून छाप पाडली आहे. शिवाय, अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांत श्रीकांत चीन, थायलंड आणि कोरियाच्या मातब्बर खेळाडूंना धक्काही दिला असल्याने त्याच्याविरुद्ध कोणताही खेळाडू गाफील राहण्याची चूक करणार नाही. बॅडमिंटनमध्ये भारताची एकेरी गटात कायम चमकदार कामगिरी झाली आहे. त्यातुलनेत दुहेरीत मात्र भारतीयांनी निराशा केली आहे. सातत्याचा अनुभव असलेल्या ज्वाला-अश्विनी या अनुभवी जोडीकडून पदकाची अपेक्षा आहे. मात्र, प्रत्यक्ष स्पर्धेत त्यांचा खेळ कसा होतो, यावर सर्व गणित अवलंबून आहे. तर, पहिल्यांदाच आॅलिम्पिकमध्ये पात्र ठरलेली भारताची पुरुष दुहेरी जोडी मनू अत्री-बी. सुमन रेड्डी यांना अनुभवाचा काही प्रमाणात फटका बसू शकतो. मात्र, काही दिवसांपूर्वीच कॅनडा ओपनचे जेतेपद पटकावून या दोघांनीही इतर प्रतिस्पर्ध्यांना धोक्याचा इशारा दिला आहे.
सायना, सिंधू आणि श्रीकांत या मुख्य खेळाडूंसह दोन्ही दुहेरीची जोडी बहरली, तर गतस्पर्धेच्या तुलनेत रिओ आॅलिम्पिकमध्येही भारत बॅडमिंटनमध्ये नक्कीच पदक पटकावेल. राष्ट्रीय प्रशिक्षक गोपीचंद यांनीही हीच आशा व्यक्त करताना सांगितले, ‘‘खेळाडूंची चांगल्याप्रकारे तयारी झाली आहे. मात्र, दडपणाखाली खेळ कसा होतो, यावर बरेच काही अवलंबून आहे.’’ त्याचप्रमाणे पदक पटकावण्यासाठी प्रत्येक भारतीय खेळाडूपुढे चिनी भिंत पार करण्याचे मुख्य आव्हान असेल. आॅलिम्पिकमध्ये सर्वाधिक ३९ पदके चीनने जिंकली आहेत.
- रोहित नाईक, मुंबई
>लक्षवेधी...
आॅलिम्पिक इतिहासात बॅडमिंटनमध्ये सर्वाधिक ३८ पदके चीनने पटकावली आहेत. त्यानंतर इंडोनेशिया व दक्षिण कोरिया यांनी अनुक्रमे १८ पदके जिंकली आहेत.
१९७२मध्ये आॅलिम्पिकमध्ये पहिल्यांदा बॅडमिंटन प्रायोगिक खेळ म्हणून सहभागी.
१९८८मध्ये आॅलिम्पिकमध्ये बॅडमिंटनचा प्रेक्षणीय खेळ म्हणून समावेश.
१९९२पासून बॅडमिंटन आॅलिम्पिकमध्ये मुख्य खेळ म्हणून समाविष्ट.

Web Title: Significant achievements of Chinese walls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.