जागतिक ज्युनिअर बुद्धिबळ स्पर्धेत पुण्याच्या अभिमन्यू पुराणिकला रौप्य
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2018 02:41 AM2018-09-16T02:41:09+5:302018-09-16T02:41:28+5:30
पुण्यातील सर्वांत तरूण ग्रॅण्डमास्टर अभिमन्यू पुराणिक याने आपल्या कारकिर्दीतील आणखी एक महत्त्वपूर्ण यश मिळवले
पुणे : पुण्यातील सर्वांत तरूण ग्रॅण्डमास्टर अभिमन्यू पुराणिक याने आपल्या कारकिर्दीतील आणखी एक महत्त्वपूर्ण यश मिळविताना जागतिक ज्युनिअर बुद्धिबळ स्पर्धेत शनिवारी रौप्यपदकाची कमाई केली.
टर्की येथे ही स्पर्धा झाली. ११ फेरींच्या या स्पर्धेत इराणचा ग्रॅण्डमास्टर पारहम मॅगसॉद्लो याने ९.५ गुणांसह सुपर्णपदक पटकावले. अभिमन्यूला ८.५ गुणांसह रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. अभिमन्यूने अखेरच्या फेरीत ग्रॅण्डमास्टर अराम हाकोबयान याच्यावर मात केली. रशियाचा इंटरनॅशनल मास्टर सर्गेई लोबानोव कांस्यपदकाचा मानकरी ठरला.
स्पर्धेच्या प्रारंभी काहीसा चाचपडत खेळ करणाऱ्या अभिमन्यूला पहिल्या ५ फेरींमध्ये ३.५ गुणांचीच कमाई करता आली. नंतर मात्र त्याने आपला खेळ कमालीचा उंचावला. अखेरच्या ६ फेरींमध्ये त्याने जोरदार मुसंडी मारताना ५ गुण मिळविले. या स्पर्धेत त्याने ७ विजय, ३ बरोबरी आणि १ पराभव अशी कामगिरी केली. या स्पर्धेत अभिमन्यूला २३वे मानांकन देण्यात आले होते.
१८ वर्षीय अभिमन्यू सिम्बायोसिस महाविद्यालयात बी. कॉमच्या पहिल्या वर्षाला शिकत आहे. ‘फिडे’चे मान्यताप्राप्त प्रशिक्षक जयंत गोखले यांच्या मार्गदर्शनाखाली तो २००७ पासून सराव करीत आहे.