तिरंदाजी विश्वकप दीपिका-चंपिया यांना रौप्य
By admin | Published: August 17, 2015 10:51 PM2015-08-17T22:51:00+5:302015-08-17T22:51:00+5:30
अव्वल भारतीय महिला तिरंदाज दीपिका कुमारी आणि मंगलसिंग चंपिया यांना मिश्र रिकर्व्ह गटात अंतिम फेरीत पराभव स्वीकारावा लागल्यामुळे तिरंदाजी विश्वकप
राकला : अव्वल भारतीय महिला तिरंदाज दीपिका कुमारी आणि मंगलसिंग चंपिया यांना मिश्र रिकर्व्ह गटात अंतिम फेरीत पराभव स्वीकारावा लागल्यामुळे तिरंदाजी विश्वकप स्पर्धेच्या तिसऱ्या टप्प्यात रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
रविवारी झालेल्या अंतिम लढतीत भारतीय मिश्र जोडीला मेक्सिकोच्या आइदा रोमन व जुआन रेने सेरानो यांच्याविरुद्ध १-५ ने पराभव स्वीकारावा लागला. या पराभवामुळे दीपिका-चंपिया जोडीचे सुवर्णपदक पटकावण्याचे स्वप्न भंगले. दीपिका-चंपिया जोडीने शानदार सुरुवात करताना पहिला सेट ३६-३६ ने बरोबरीत सोडवताना लढतीत रंगत निर्माण केली. दुसऱ्या सेटमध्ये मात्र भारतीय जोडीला लय कायम राखता आली नाही. मेक्सिकन जोडीने दोन परफेक्ट शॉट लगावताना ३७-३५ ने सेट जिंकला. तिसऱ्या सेटमध्ये १-० च्या आघाडीसह उतरणाऱ्या मेक्सिकन जोडीने ३७ चा स्कोअर नोंदवला, तर दीपिका-चंपिया जोडीला कडव्या संघर्षानंतरही ३६ चा स्कोअर करता आला. त्यामुळे चौथा सेट खेळण्याची गरज भासली नाही. विश्वकप स्पर्धेत भारताचे दुसरे रौप्यपदक आहे. यापूर्वी भारतीय तिरंदाज व जागतिक क्रमवारीत १८ व्या स्थानावर असलेल्या अभिषेक वर्माने पुरुषांच्या कम्पाऊंड वैयक्तिक स्पर्धेत सुवर्णपदकाचा मान मिळवला. (वृत्तसंस्था)