वेटलिफ्टींगमध्ये गोव्याला रौप्य पदक, शुभम वर्माची कामगिरी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2023 04:24 PM2023-10-28T16:24:02+5:302023-10-28T16:43:34+5:30
शुभम वर्मा याने पुरुषांच्या १०२ किलो गटात ही कामगिरी केली आहे. यावेळी सेनादलच्या कोजुम ताबा याने सुवर्ण आणि आसामच्या जमीर हुसैन याने कांस्य पदक प्राप्त केले.
- समीर नाईक
पणजी: ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत शनिवारी वेटलिफ्टींगमध्ये गोव्याच्या शुभम वर्मा याने रौप्य पदक प्राप्त करत गोव्याच्या पदक तालिकेत भर घातली आहे. शुभम वर्मा याने पुरुषांच्या १०२ किलो गटात ही कामगिरी केली आहे. यावेळी सेनादलच्या कोजुम ताबा याने सुवर्ण आणि आसामच्या जमीर हुसैन याने कांस्य पदक प्राप्त केले.
सेनादलच्या कोजुम ताबा याने १४८ किलो स्नच, १८६ किलो क्लीन अँड जर्क करत एकूण ३३० किलो वजन उचलत सुवर्ण पदक प्राप्त केले. गोव्याच्या शुभम वर्मा याने १४६ किलो स्नच, १८८ किलो क्लीन अँड जर्क करत एकूण ३२६ किलो वजन उचलत रौप्य पदक प्राप्त केले, तर आसामच्या जमीर हुसैन याने १४५ किलो स्नच, १८६ किलो क्लीन अँड जर्क करत एकूण ३२५ किलो वजन उचलत कांस्य पदक प्राप्त केले.
स्पर्धा सुरू होऊन जवळपास १० दिवस होत आले आहे. सुरुवातीच्या काळात गोव्याला काही पदके मिळाली नाही, परंतु २६ रोजीपासून गोव्याने चांगली कामगिरी केली असून, गेल्या दोन दिवसातच सुमारे १२ पेक्षा जास्त पदके गव्याने मिळविली आहे.