सिमोना हालेपचे शानदार विजेतेपद
By admin | Published: May 8, 2016 07:45 PM2016-05-08T19:45:12+5:302016-05-08T19:45:12+5:30
रोमानियाच्या सिमोना हालेपने चमकदार कामगिरी करताना माद्रिद मास्टर्स टेनिस स्पर्धेत महिलांच्या एकेरी गटाचे विजेतेपद उंचावले
ऑनलाइन लोकमत
माद्रिद, दि. 8- जागतिक टेनिसमधील सातव्या क्रमांकाची रोमानियाच्या सिमोना हालेपने चमकदार कामगिरी करताना माद्रिद मास्टर्स टेनिस स्पर्धेत महिलांच्या एकेरी गटाचे विजेतेपद उंचावले. अंतिम सामन्यात एकहाती वर्चस्व राखताना हालेपने स्लोवाकियाच्या डोमिनिका सिबुकोवाचे आव्हान २-० असे सहजपणे परतावले.
सुमारे दीड तास रंगलेल्या अंतिम सामन्यात हालेपने सिबुकोवाला आपला खेळ करण्याची क्वचितच संधी दिली. आक्रमक व ताकदवर फटक्यांची बरसात करताना हालेपने सिबुकोवाचा धुव्वा उडवताना ६-२, ६-४ असा दणदणीत बाजी मारली. विशेष म्हणजे मागील १४ महिन्यांत हालेपचे हे पहिलेच डब्ल्यूटीए विजेतेपद ठरले. तसेच हालेपने कारकिर्दीत एकूण १२वे जेतेपदही पटकावले. गतवर्षी हालेपने इंडियन वेल्स स्पर्धेत वर्चस्व राखले होते.
या विजेतेपदासह हालेपच्या मानांकनाच सुधारणा होण्याची पुर्ण संभावना असतानाच दुसरीकडे क्ले कोर्टवर होणाऱ्या आगामी फ्रेंच ओपन ग्रँडलॅमस्पर्धेत तीने संभाव्य विजेत्यांमध्येही स्थान मिळवले आहे.
२०१४ साली फ्रेंच ओपनमध्ये उपविजेतेपद पटकावलेल्या हालेपने सिबुलकोवाविरुध्द जोरादार ग्राउंड शॉट मारताना वेगवान खेळ केला. पहिला सेट सहजपणे जिंकल्यानंतर तीला सिबुलकोवाकडून काहीप्रमाणात प्रतिकार मिळाला. मात्र सामन्यावरील पकड कमी न करताना हालेपने दुसऱ्या सेटसह विजेतेपदावर कब्जा केला.