सिंधूची अंतिम फेरीत धडक
By admin | Published: April 2, 2017 02:27 AM2017-04-02T02:27:19+5:302017-04-02T02:27:19+5:30
पी. व्ही. सिंधूने शनिवारी इंडिया सुपर सिरीज बॅडमिंटनच्या उपांत्य फेरीत जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर असलेली कोरियन खेळाडू सुंग जी ह्यूनचा पराभव करीत अंतिम फेरी गाठली
नवी दिल्ली : आॅलिम्पिक रौप्यपदक विजेत्या पी. व्ही. सिंधूने शनिवारी इंडिया सुपर सिरीज बॅडमिंटनच्या उपांत्य फेरीत जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर असलेली कोरियन खेळाडू सुंग जी ह्यूनचा पराभव करीत अंतिम फेरी गाठली. सिंधूला जेतेपदासाठी आॅलिम्पिक चॅम्पियन कॅरोलिना मारिनच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. सिरी फोर्ट संकुलात खेळल्या जात असलेल्या या स्पर्धेत सिंधूने चमकदार कामगिरी करताना दुसऱ्या मानांकित ह्यूनची झुंज २१-१८, १४-२१, २१-१४ ने मोडून काढली.
चाहत्यांना आता रंगतदार अंतिम लढत बघण्याची संधी मिळणार आहे. ही लढतही आॅलिम्पिकच्या अंतिम लढतीप्रमाणेच होईल, अशी आशा आहे. आॅलिम्पिकची अंतिम लढत जगभरात कोट्यवधी चाहत्यांनी बघितली होती. त्याआधी, दोनदा विश्वविजेतेपदाचा मान मिळविणाऱ्या मारिनने जपानच्या अकाने यामागुचीचा पराभव केला. स्पेनच्या खेळाडूने
चौथे मानांकन प्राप्त यामागुची विरुद्ध २१-१६, २१-१४ ने सहज विजय नोंदविला.
क्रीडा चाहत्यांनी या लढतीत ‘सिंधू’ आणि ‘इंडिया’ असे नारे लावत सिंधूचा उत्साह वाढविला. या लढतीपूर्वी सिंधूची ह्यूनविरुद्धची कामगिरी ६-४ होती. सिंधूने आज चमकदार खेळ केला.
सिंधूने गेल्या वर्षी चायना ओपनमध्ये कारकिर्दीत प्रथमच सुपर सीरिजचे जेतेपद पटकावले होते. तिने हाँगकाँग ओपनची अंतिम फेरी गाठली होती. सिंधूने चेन्नई स्मॅशर्सला प्रीमिअर बॅडमिंटन लीगचे जेतेपद पटकावून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. लखनौमध्ये जानेवारी महिन्यात सैयद मोदी आंतरराष्ट्रीय ग्रांप्री गोल्ड स्पर्धेत जेतेपद पटकावित तिने आंतरराष्ट्रीय मोसमाची सुरुवात केली होती.
डेन्मार्कच्या व्हिक्टर एक्सेलसनने सलग तिसऱ्यांदा इंडिया ओपनमध्ये अंतिम फेरी गाठली. व्हिक्टरने सहाव्या मानांकित हाँगकाँगच्या एनजी लोंग एंगसचा उपांत्य फेरीत २१-१२, २१-१३ ने पराभव केला. व्हिक्टरला अंतिम फेरीत चिनी ताइपेच्या सातव्या मानांकित चोऊ टिएन चेनच्या आव्हानाला सामोरे जावे लागले. चेनने उपांत्य फेरीत डेन्मार्कच्या एंडर्स एंटोनसेनचा २१-१७, २१-१४ ने पराभव केला.
पुरुष दुहेरीत सहाव्या मानांकित इंडोनेशियाच्या कारांदासुवार्डी व एंग्गा प्रातामा यांनी चीनच्या ली जुन्हुई व ली युनचेन या पाचव्या मानांकित जोडीचा २१-१६, १३-२१, २१-१६ ने पराभव केला. आता अंतिम फेरीत त्यांना इंडोनेशियाच्या मार्कस फर्नांल्डी गिडियोन व केव्हिन संजया सुकामुलजो यांच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल.
महिला दुहेरीत नाओको फुकुमान व कुरुमी योनाओ यांनी मायदेशातील सहकारी युकी फुकुशिमा व सयाका हिरोटा यांचा २१-१६,
२१-१३ ने पराभव केला. आता त्यांना जपानच्या ही शिहो-कोहारू योनोमोटो यांच्याविरुद्ध
लढत द्यावी लागेल. मिश्र दुहेरीची
अंतिम लढत चीनच्या लु कोई - हुआंग याकियोंग व झेंग सिवेई-चेन किंगचेन यांच्यादरम्यान होणार आहे.
लढत चुरशीची होणार असल्याची कल्पना होती
सिंधू म्हणाली, ‘लढत चुरशीची होणार असल्याची कल्पना असल्यामुळे मी या लढतीसाठी सुरुवातीपासून सज्ज होते. दुसऱ्या गेममध्ये ५-२ अशी आघाडी घेतली होती, पण मी टाळण्याजोग्या चुका केल्या. दरम्यान, एक स्मॅश कोर्टबाहेरही मारला. त्यानंतर तिने ११-६ अशी आघाडी घेतली, मी प्रयत्न केला, पण अखेर तिने आघाडी कायम राखली.’
सिंधू पुढे म्हणाली,‘निर्णायक गेममध्ये मी सुरुवातीपासून आक्रमक खेळ केला. गेल्या वर्षी काही चुका केल्या होत्या, त्यामुळे तिला आघाडी घेण्याची संधी मिळाली होती. तिसऱ्या गेममध्ये तिने पुनरागमनाचा प्रयत्न केला, पण मी संधी दिली नाही.’
मारिनविरुद्धच्या अंतिम लढतीबाबत बोलताना सिंधू म्हणाली,‘दुबई फायनल्समध्ये आम्ही खेळलो होतो. त्यावेळी मी तिचा पराभव केला होता, पण तिने पीबीएलमध्ये त्याची परतफेड केली होती. यावेळी लढत दिल्लीत असल्यामुळे स्थानिक प्रेक्षकांचा मला पाठिंबा राहील. ही एक नवी लढत राहणार असून परिस्थितीही वेगळी असेल. आम्हाला एकमेकींच्या खेळाची कल्पना असली तरी रणनीती नवी राहील. त्यामुळे लढतीच्या दिवशी चांगला खेळ करणारी खेळाडू बाजी मारेल. मला सकारात्मक निकालाची आशा आहे.’