सिंधूला ३९ लाखांवर समाधान मानावे लागले
By Admin | Published: November 10, 2016 04:32 AM2016-11-10T04:32:09+5:302016-11-10T04:32:09+5:30
रिओ आॅलिम्पिकमध्ये रौप्य पदक पटकावून ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या भारताच्या पी. व्ही. सिंधूला प्रीमियर बॅडमिंटन लीग (पीबीएल) स्पर्धेच्या दुसऱ्या सत्रातील लिलावामध्ये ३९ लाख रुपयांची
नवी दिल्ली : रिओ आॅलिम्पिकमध्ये रौप्य पदक पटकावून ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या भारताच्या पी. व्ही. सिंधूला प्रीमियर बॅडमिंटन लीग (पीबीएल) स्पर्धेच्या दुसऱ्या सत्रातील लिलावामध्ये ३९ लाख रुपयांची आश्चर्यकारक किंमत मिळाली. त्याचवेळी सिंधूला नमवून रिओ आॅलिम्पिकमध्ये सुवर्ण पटकावलेल्या स्पेनच्या कॅरोलिना मारिनला तब्बल ६१.५ लाखांची किंमत मिळाली. यासह तिने स्पर्धेतील सर्वांत महागड्या खेळाडूचा मान मिळवला.
पीबीएलच्या दुसऱ्या सत्रासाठी झालेल्या लिलावात भारतीय खेळाडूंवर विशेष लक्ष होते. पुरुष एकेरीतील स्टार किदाम्बी श्रीकांतला ५१ लाख रुपयांची दमदार किंमत मिळाली. तर, भारतीय बॅडमिंटनचा चेहरा असलेली ‘फुलराणी’ सायना नेहवाल हिला मात्र ३३ लाख रुपयांच्या किमतीवर समाधान मानावे लागले. तसेच, सूंग जी नू आणि जान ओ जोर्गेनसन यांना अनुक्रमे ६० व ५९ लाख रुपयांची किंमत मिळाली.
चेन्नई स्मॅशर्स संघाने सलग दुसऱ्या वर्षी सिंधूला आपल्या टीममध्ये राखण्यात यश मिळवले. मात्र, आॅलिम्पिक रौप्य पदक विजेती असूनही सिंधूला इतकी कमी किंमत मिळाल्याची चर्चा यावेळी जास्त झाली. यावर सिंधूने, ‘आमच्यासाठी खेळ महत्त्वाचा आहे, किंमत नाही.’ असे सांगून या विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
दुसरीकडे, टीम मालकांच्या मते सिंधू देशाची सर्वात मोठी आयकॉन खेळाडू आहे. मात्र, तिला मिळालेल्या किमतीविषयी विचारले असता त्यांनी सांगितले की, ‘ही एक लिलाव प्रक्रिया आहे. यामध्ये सिंधूचे नाव सर्वांत मागे होते. यामुळे जोपर्यंत सिंधूचे नाव समोर आले, तोपर्यंत बहुतांश संघांचे पैसे खर्च झाले होते. कदाचित यामुळेच सिंधूला कमी किंमत मिळाली असेल.’
पीबीएलचे दुसरे सत्र एक जानेवारीपासून हैदराबाद येथे सुरु होईल आणि स्पर्धेचा अंतिम सामना १४ जानेवारीला खेळविण्यात येईल. या लिलावामध्ये प्रत्येक संघाकडे १.९३ करोड रुपयांची मर्यादा होती आणि प्रत्येक संघाला १० खेळाडू आपल्याकडे घ्यायचे होते. तसेच प्रत्येक संघाकडे एक आयकॉन खेळाडू आणि जास्तीत जास्त सहा विदेशी खेळाडू ठेवण्याची अट होती.