सिंधू, जयराम उपांत्य फेरीत पराभूत
By admin | Published: January 17, 2015 11:59 PM2015-01-17T23:59:54+5:302015-01-17T23:59:54+5:30
१ लाख २० हजार डॉलर बक्षीस रकमेच्या मलेशिया मास्टर्स ग्रां़प्री़ गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागला.
कुचिंग : (मलेशिया) विश्व बॅडमिंटन स्पर्धेत कास्यपदकाची कमाई करणाऱ्या भारताच्या पी़ व्ही़ सिंधू व अजय जयराम यांना १ लाख २० हजार डॉलर बक्षीस रकमेच्या मलेशिया मास्टर्स ग्रां़प्री़ गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागला.
२०१३मध्ये स्पर्धेत अजिंक्यपद मिळविणाऱ्या सिंधूला जेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जात होते़ मात्र सेमीफायनलमध्ये तिला जपानच्या चौथे मानांकनप्राप्त नोजोमी ओकूहारा हिच्याकडून १ तास २४ मिनिटांपर्यंत रंगलेल्या लढतीत १९-२१, २१-१३, २१-८ असा पराभव स्वीकारावा लागला़
विशेष म्हणजे या सामन्यात सिंधूने पहिला गेम २१-१९ने आपल्या नावे केला होता़ मात्र यानंतर तिला कामगिरीत सातत्य राखता आले नाही़ दुसरा गेम १३-३१ने हरल्यानंतर
तिसऱ्या गेममध्ये सिंधूने प्रतिस्पर्धी खेळाडूंपुढे गुडघे टेकले़ जपानच्या खेळाडूने हा गेम २१-८ असा एकतर्फी जिंकत स्पर्धेच्या फायनलमध्ये मजल मारली़
ओकूहाराला फायनल लढतीत तृतीय मानांकनप्राप्त आपल्याच देशाच्या सयाका ताकाहाशी हिच्याशी झुंज द्यावी लागणार आहे़ सयाकाने अन्य उपांत्य लढतीत सयाका सातोंला २१-७, १४-२१, २१-२० अशा फरकाने धूळ चारली़ हा सामना अवघ्या ४९ मिनिटांत संपला़ (वृत्तसंस्था)
च्भारताच्या पी़ व्ही़ सिंधूसह अजय जयरामलासुद्धा मलेशिया मास्टर्स ग्रां़ प्री़ गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला़ जयरामला कोरियाच्या जिओन हियोक जिन याच्याकडून १०-२१, २१-१७, २१-१६ अशा फरकाने मात खावी लागली़ हा सामना ५८ मिनिटांपर्यंत चालला़