सिंधूने इतिहास घडवला, रौप्य पदक पटकावलं

By Admin | Published: August 19, 2016 09:01 PM2016-08-19T21:01:07+5:302016-08-19T23:17:27+5:30

भारतासाठी प्रथचं रौप्य पदक पटकावण्याचा पराक्रम तिने केला आहे. दबावात उत्कृष्ट प्रदर्षण करताना स्पेनच्या अग्रमांनाकित कॅरोलिना मारिन चांगलेचं झुंजवले.

Sindhu made history, got silver medal | सिंधूने इतिहास घडवला, रौप्य पदक पटकावलं

सिंधूने इतिहास घडवला, रौप्य पदक पटकावलं

googlenewsNext

आॅलिम्पिकमध्ये पटकावले रौप्यपदक : स्पेनची कॅरोलिना मारिन ठरली सुवर्णपदकाची मानकरी

ऑनलाइन लोकमत
रिओ, दि. १९ : आशा निराशेच्या हिंदोळ्यावर अतिशय चुरशीने झालेल्या अंतिम सामन्यात स्पेनच्या कॅरोलिना मारिन हिने भारताच्या पी. व्ही. सिंधूला १९-२१, २१-१२, २१-१५ असे हरवून २0१६ रिओ आॅलिम्पिकमध्ये बॅडमिंटनचे सुवर्णपदक जिंकले. आॅलिम्पिकमध्ये अंतिम फेरी गाठणारी पहिली बॅडमिंटनपटू बनण्याचा बहुमान मिळवणारी सिंधू रौप्यपदकाची मानकरी ठरली. 

सिंधूने पिछाडीवरुन येवून पहिला गेम जिंकल्यामुळे भारतीय चाहत्यांची सुवर्णपदकाची आस आणखीनच तीव्र बनली परंतु वर्ल्ड चॅम्पियन मारिनने आपला सर्व अनुभव पणाला लावून दुसऱ्या आणि तिसऱ्या गेममध्ये सिंधूला मात दिली. अंतिम सामन्यात पराभूत झाली असली तरी सिंधूने जिगरबाज खेळाचे प्रदर्शन करुन सव्वाशे कोटी भारतीयांची मने मात्र जिंकली आहेत. जपानच्या नोजोमी ओकुहारा हिला कांस्यपदक मिळाले. उपांत्य सामन्यात सिंधूने ओकुहारा हिला तर कॅरोलिना मारिनने गत चॅम्पियन चीनच्या ली जुईरुईचा पराभव करीत अंतिम फेरी गाठली होती.

पहिल्या सेटमध्ये सिंधूची पिछाडीवरुन आघाडी
काल, शुक्रवारी झालेल्या सामन्यात पहिल्या गेममध्ये मारिनने आक्रमक खेळाने सुरवात केली. तिने पहिल्या पॉर्इंटपासूनच आघाडी घेतली. सिंधूने तिला गाठण्याचा खूपवेळा प्रयत्न केला, परंतु जोरदार स्मॅश लगावत मारिन पुढेच जात होती. सिंधू १६ पॉर्इंटवर असताना मारिन गेम पॉइंटपासून केवळ दोन पॉर्इंट मागे म्हणजे १९ गुणांवर होती. पण यानंतर सिंधू सुसाट सुटली. तिने सलग पाच गुण घेत २१-१९ असा गेम जिंकला. पहिला गेम जिंकल्यानंतर भारतीय चाहत्यांच्या आनंदाला उधाण आले होते. गेम जिंकला असला तरी सिंधूने यामध्ये काही चुकाही केल्या शिवाय तिचे एक रेफरल वाया गेले.

दुसऱ्या गेममध्ये मारिनचे पुनरागमन
पहिल्या गेममध्ये अचानक झालेल्या आक्रमणामुळे गोंधळून गेलेल्या मारिनने दुसऱ्या गेममध्ये आपल्या रणनितीत बदल केला. स्वत:ला शांत ठेवण्याचा प्रयत्न करीत तिने आपली आघाडी वाढवण्याकडे लक्ष दिले. सिंधूला फोरहँड, बॅकहँडच्या जोरदार फटक्यांनी जेरीस आणीत मारिनने हा सेट २१-१२ असा सहज जिंकला. 

निर्णायक तिसरा गेम
सामन्यात बरोबरी साधल्याने उत्साहीत झालेल्या मारिनने तिसऱ्या आणि निर्णायक सेटची सुरवातही आक्रमक केली. मारिनने पाच पॉईंटची कमाई केली त्यावेळी सिंधूचा एक पॉईंट झाला होता. पण सिंधूने दबाव न घेता ही आघाडी कमी करण्याच्यादृष्टीने प्रयत्न केले. तिच्या या प्रयत्नांना दहाव्या पॉर्इंटवर बरोबरी साधली. पण यानंतर सिंधूने सलग चार पॉईंट गमावल्याने मारिनने १४-१0 अशी आघाडी साधली. अकराव्या पॉर्इंटच्यावेळी मारिनचा पाय मुरगळाला पण तिने लगेच सामन्यात पुनरागमन केले. यानंतर तिने सिंधूला फारशी संधी न देता २१-१५ अशी विजेतेपदाला गवसणी घातली. हा सामना १ तास २३ मिनिटे चालला.
भारताचे चौथे रौप्यपदक
सिंधूने आज मिळवलेले रौप्यपदक हे भारताचे आॅलिम्पिक इतिहासातील एकूण चौथे वैयक्तिक रौप्यपदक आहे. यापूर्वी नेमाबाज राज्यवर्धनसिंग राठोड (अथेन्स २00४), विजयकुमार (लंडन २0१२) आणि मल्ल सुशीलकुमार (लंडन २0१२) यांनी तीन रौप्यपदके देशाला मिळवून दिली आहेत.

आॅलिम्पिक पदक विजेती पाचवी महिला
सिंधू आॅलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी पाचवी भारतीय महिला ठरली आहे. यापूर्वी कर्नाम मल्लेश्वरी, मेरिकोम, सायना नेहवाल आणि साक्षी मलिक यांनी आॅलिम्पिकमध्ये कांस्यपदके जिंकली आहेत. पण सिंधूने यापुढे जात रौप्यपदकाची कमाई केली.

    

 

Web Title: Sindhu made history, got silver medal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.