सिंधू, समीर यांना विजेतेपद
By admin | Published: January 30, 2017 03:29 AM2017-01-30T03:29:50+5:302017-01-30T03:29:50+5:30
रौप्यपदकविजेती पी. व्ही. सिंधू आणि राष्ट्रीय चॅम्पियन समीर वर्मा यांनी नव्या वर्षाची शानदार सुरुवात करताना रविवारी येथे १,२०,००० डॉलर बक्षीस रकमेची सय्यद मोदी ग्रांप्री गोल्ड बॅडमिंटन
लखनौ : रौप्यपदकविजेती पी. व्ही. सिंधू आणि राष्ट्रीय चॅम्पियन समीर वर्मा यांनी नव्या वर्षाची शानदार सुरुवात करताना रविवारी येथे १,२०,००० डॉलर बक्षीस रकमेची सय्यद मोदी ग्रांप्री गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेत अनुक्रमे महिला व पुरुष गटात विजेतेपद पटकावले. विशेष म्हणजे, भारताने या स्पर्धेत वर्चस्व राखताना पाचपैकी तीन गटांत अजिंक्यपद आपल्या नावावर केले.
गेल्या सत्रात शानदार फॉर्ममध्ये असणाऱ्या अव्वल मानांकित सिंधूने इंडोनेशियाच्या ग्रेगोरिया मरिस्काचा २१-१३, २१-१४ असा पराभव केला, तर हाँगकाँग सुपर सिरीजच्या फायनलमध्ये धडक मारणाऱ्या समीरने आपल्याच देशाच्या साई प्रणीतचा ४४ मिनिटे रंगलेल्या लढतीत २१-१९, २१-१६ असा पराभव केला.
ब्राझील आणि रशियात ग्रांप्री विजेतेपद जिंकणाऱ्या प्रणव जेरी चोपडा आणि एन. सिक्की रेड्डी या द्वितीय मानांकित जोडीनेदेखील मिश्र दुहेरीतील आपले पहिले ग्रांप्री गोल्डचे विजेतेपद पटकावले. या जोडीने अंतिम सामन्यात अश्विनी पोनप्पा आणि बी. सुमीत रेड्डीला सातव्या मानांकित जोडीला २२-२०, २१-१० असे नमवले.
महिला एकेरीत सिंधूला आपले पहिले सय्यद मोदी विजेतेपद जिंकण्यासाठी मरिस्का हिचा ३० मिनिटे रंगलेल्या लढतीत जास्त कष्ट करावे लागले नाहीत. ती २०१४मध्ये जागतिक क्रमवारीतील माजी नंबर वन सायना नेहवालकडून पराभूत झाली होती. विद्यमान आॅलिम्पिक रौप्यपदकविजेती आणि डेन्मार्कची अव्वल मानांकित कॅमिला रिटरल जुहल आणि क्रिस्टिना पेडरसन यांनी भारताची नवीन जोडी अश्विनी पोनप्पा आणि एन. सिक्की रेड्डी यांना ३८ मिनिटांत २१-१६, २१-१८ असे पराभूत करीत महिला दुहेरीचे विजेतेपद पटकावले.
लंडन आॅलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकणारा अव्वल मानांकित माथियास बो आणि कर्स्टन मोगेनसेन या जोडीने पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावले. या जोडीने चिनी-तैपेईच्या लू चिंग याओ आणि यांगा पो हान या आठव्या मानांकित जोडीला एकतर्फी अंतिम फेरीत २१-१४, २१-१५ असे पराभूत केले.