सिंधू, श्रीकांत यांची विजयी सलामी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2019 12:23 AM2019-07-18T00:23:47+5:302019-07-18T00:24:05+5:30
इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन; प्रणॉयचे आव्हान संपुष्टात
जकार्ता : भारताचे आघाडीचे बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू आणि किदाम्बी श्रीकांत यांनी बुधवारी इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या पहिल्या फेरीत विजय मिळवला.
सिंधू व श्रीकांत यांनी अनुक्रमे महिला व पुरुष एकेरीच्या सामन्यात जपानच्या अया ओहोरी व केंता निशिमोतो यांना पराभूत केले. या मोसमातील पहिले जेतेपद पटकावण्याच्या तयारीत असलेल्या सिंधूला आहोरी हिने चांगलीच लढत दिली. सिंधूने हा सामना ११-२१, २१-१५, २१-१५ असा जिंकला. या वर्षी इंडिया ओपनच्या अंतिम फेरीत पोहचलेल्या श्रीकांतने निशिमोतो याला फक्त ३८ मिनिटे रंगलेल्या सामन्यात २१-१४, २१-१३ असे सहज पराभूत केले.
ओहोरीविरुद्ध सिंधूचा हा सलग सातवा विजय आहे. श्रीकांतने निशिमोतोविरुद्ध पाचवा सामना जिंकला. निशिमोतो सहा पैकी फक्त एकदाच श्रीकांतचा पराभव करु शकला आहे. जागतिक क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर असलेल्या सिंधूचा पुढील सामना डेन्मार्कच्या मिया ब्लिकफेल्ट व हॉँगकॉँगची यिप पुई यिन यांच्यातील विजेत्याशी होणार आहे.
अन्य भारतीयांमध्ये एच. एस. प्रणॉय व बी. साईप्रणित यांना पराभूत होऊन स्पर्धेबाहेर पडावे लागले. प्रणितला वोंग विंग याने १५-२१, २१-१३, १०-२१ असे पराभूत केले. प्रणॉयला चीनच्या दुसऱ्या मानांकित शी युकीकडून संघर्षपूर्ण सामन्यात २१-१९, १८-२१, २०-२२ असे पराभूत व्हावे लागले.
सात्विकसाईराज रंकी रेड्डी व अश्विनी पोनप्पा या मिश्र दुहेरीतील जोडीला पहिल्या फेरीत पराभवाचा धक्का बसला. विनी ओकताविना कंडो व तोनतोवी अहमद या जोडीने त्यांचा १३-२१, ११-२१ असे पराभूत केले. (वृत्तसंस्था)