सिंधू, साक्षी, दीपाला मिळाली बीएमडब्ल्यू
By admin | Published: August 29, 2016 01:57 AM2016-08-29T01:57:29+5:302016-08-29T01:57:29+5:30
रिओ आॅलिम्पिकमध्ये भारतीय संघाचा सद्भावना दूत राहिलेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने येथे रविवारी आयोजित एका कार्यक्रमात
हैदराबाद : रिओ आॅलिम्पिकमध्ये भारतीय संघाचा सद्भावना दूत राहिलेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने येथे रविवारी आयोजित एका कार्यक्रमात रिओतील रौप्यपदक विजेती स्टार बॅडमिंटन खेळाडू पी. व्ही. सिंधू आणि कांस्यपदकप्राप्त महिला पैलवान साक्षी मलिक, त्याचप्रमाणे लाजवाब कामगिरी करणारी जिम्नॅस्ट दीपा कर्माकर व बॅडमिंटन प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांना बीएमडब्ल्यू कार भेट म्हणून दिली.
तेंडुलकरने खेळातील या सर्व दिग्गजांना कारची किल्ली दिली. हा भारतीय खेळासाठी खूप मोठा क्षण आहे. प्रवास येथून सुरू झाला आहे आणि हा प्रवास येथेच संपणार नाही याचा मला विश्वास वाटतो. सध्या पूर्ण देश आनंदित आहे, पण अजूनही मोठ्या बाबी बाकी आहेत, असे तेंडुलकरने सांगितले.
याप्रसंगी सिंधू म्हणाली, तेंडुलकर यांनी रिओ आॅलिम्पिकमध्ये पदक जिंकल्यास ते मला बीएमडब्ल्यू कार भेट म्हणून देतील असे वचन दिले होते. आज त्यांनी त्यांचे वचन पूर्ण केले. साक्षीनेही आनंद व्यक्त केला. आपण मनापासून यासाठी आभारी आहोत. मी रिओत कांस्यपदक जिंकण्यात यशस्वी ठरले आणि आता २0२0 ला टोकियो आॅलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकण्याचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून खेळेन, असे तिने सांगितले. (वृत्तसंस्था)
साक्षीला यंदा कर्तव्य आहे....
रिओ आॅलिम्पिकमध्ये देशाला पहिले पदक जिंकून देणारी महिला पैलवान साक्षी मलिक हिने यावर्षी लग्नबंधनात अडकू शकतो, असे सांगितले. साक्षीने हा खुलासा एका मुलाखतीत केला. ती म्हणाली, मी यावर्षी विवाह करू शकते; परंतु मी अद्याप आपल्या होणाऱ्या पतीचे नाव सांगू शकत नाही. तथापि, तो एक पैलवान आहे. विवाहानंतरही मी कारकीर्द सुरू ठेवणार आहे. माझा होणारा पती खूप सहकार्य करणारा आहे.