टी-20च्या मैदानात पुन्हा सहा चेंडूत सहा षटकार, 35 चेंडूत केले शतक
By admin | Published: May 12, 2017 12:03 PM2017-05-12T12:03:32+5:302017-05-12T12:05:18+5:30
भारताचा सिक्सर किंग युवराज सिंगने ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये स्टुअर्ट ब्रॉडला मारलेल्या सहा चेंडूत सहा षटकारांच्या आठवणी क्रिकेटप्रेमींच्या मनात अजूनही ताज्या
ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. 12 - भारताचा सिक्सर किंग युवराज सिंगने ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये स्टुअर्ट ब्रॉडला मारलेल्या सहा चेंडूत सहा षटकारांच्या आठवणी क्रिकेटप्रेमींच्या मनात अजूनही ताज्या आहेत. आता कोलकाताच्या एका तरुणाने स्थानिक टी 20 क्रिकेटमध्ये याची पुनरावृत्ती केली आहे. क्रिक ट्रॅकरच्या वृत्तानुसार, कोलकातातील भवानीपूर क्लबकडून खेळणाऱ्या अतानू घोषने सहा चेंडूत सहा षटकार लगावले आहेत.
भवनीपूर आणि राज्यस्थान क्लब दरम्यान झालेल्या सामन्यात घोषने हा भीमपराक्रम केला आहे. राज्यस्थान कल्बच्या ट्रिटीब चौधरीची गोलंदाजी त्याने फोडून काढली, त्याच्या सहा चेंडूवर 36 धावा वसूल केल्या. या सामन्यात घोषने 35 चेंडूचा सामना करताना 101 धावा केल्या. घोषच्या या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर भवानीपूर क्लबने हा सामना 145 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला. त्याच्या या धडाकेबाज फलंदाजीसाठी त्याला सामनाविर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी त्याचे आई -वडिलही उपस्थित होते.
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एका षटकात सहा षटकार मारण्याचा पराक्रम सर गॅरी सोबर्स आणि भारताच्या रवी शास्त्री यांनी केला आहे. तर आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये हा कारनामा भारताच्या युवराज सिंग आणि द. आफ्रिकेच्या हर्षल गिब्जने केला आहे.