बॅटचा आकार होणार मर्यादित
By admin | Published: June 4, 2016 02:20 AM2016-06-04T02:20:07+5:302016-06-04T02:20:07+5:30
माजी भारतीय कर्णधार अनिल कुंबळेच्या नेतृत्वाखालील आयसीसी क्रिकेट समितीने सूचना केली आहे की, मेरिलबोन क्रिकेट क्लबला (एमसीसी) क्रिकेटमध्ये समतोल साधण्यासाठी बॅटच्या
लंडन : माजी भारतीय कर्णधार अनिल कुंबळेच्या नेतृत्वाखालील आयसीसी क्रिकेट समितीने सूचना केली आहे की, मेरिलबोन क्रिकेट क्लबला (एमसीसी) क्रिकेटमध्ये समतोल साधण्यासाठी बॅटच्या आकाराची मर्यादा निश्चित करण्याबाबत गांभीर्याने विचार करायला पाहिजे.
टी-२० आणि वन-डे क्रिकेटमध्ये मोठी धावसंख्या उभारणे आणि चुकीचा फटका खेळल्यानंतरही चेंडू सीमारेषेच्या पल्याड जात असल्यामुळे जाणकारांना चिंता सतावत आहे. जाणकारांच्या मते क्रिकेटची वाटचाल फलंदाजाचा खेळ म्हणून होत आहे.
‘स्वीट स्पॉट’वर नियंत्रण असावे
आयसीसीने लॉर्डस्मध्ये क्रिकेट समितीच्या झालेल्या चर्चेची विस्तृत माहिती देताना म्हटले आहे की, एमसीसीने बॅट आणि चेंडू यामध्ये समतोल साधण्यासाठी करण्यात येणाऱ्या बदलांबाबत समितीला सूचना देण्यास सांगण्यात आले होते. समितीला एमसीसीतर्फे एक पत्र मिळाले. त्यात विविध तर्क आणि आकडेवारी आधारावर अलीकडच्या कालावधीत बॅट अधिक मजबूत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्याचे मुख्य कारण ‘स्वीट स्पॉट’चा आकार अधिक मोठा असणे आहे. त्यात म्हटले आहे की, समितीच्या मते एमसीसीने बॅट व चेंडूमध्ये समतोल साधण्यासाठी बॅटच्या आकाराची मर्यादा निश्चित करण्याबाबत गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे.’
ब्रिटिश निकषानुसार हेल्मेट असावे
समितीमध्ये राहुल द्रविड, माहेला जयवर्धने, अॅण्ड्य्रू स्ट्रॉस यांच्यासारख्या माजी आंतरराष्ट्रीय कर्णधारांचा समावेश आहे. अनेक फलंदाज ब्रिटिश सुरक्षा निकषानुसार (बीएसएस) हेल्मेटचा वापर करीत नसल्याचे निदर्शनास आले आहे. आयसीसीचे वैद्यकीय सल्लागार डॉ. क्रेग रॅनसन यांनी दुखापती टाळण्यासाठी सावधगिरी बाळगण्याबाबत कार्यक्रम सादर केला. त्यानंतर समितीने हेल्मेटबाबत सुरक्षिततेच्या मुद्द्यावर चर्चा केली. अनेकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू ब्रिटिश सुरक्षा निकष (बीएसएस) पूर्ण न करणाऱ्या हेल्मेटचा वापर करतात. आयसीसीने बीएसएस निकष पूर्ण करणारे हेल्मेट वापरण्यास अनिवार्य करण्याची शिफारस करायला हवी, असे समितीने म्हटले आहे. क्रिकेट समितीच्या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आलेल्या अन्य मुद्द्यांमध्ये दिवस-रात्र कसोटी, पंचांच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याची पद्धत (डीआरएस), स्पोर्टिंग विकेटच्या माध्यमातून बॅट व चेंडू यामध्ये समतोल साधणे आणि बॅटचा आकार निर्धारित करणे, आदींचा समावेश आहे.
‘जामठा’च्या खेळपट्टीबाबत चिंता
माजी भारतीय कर्णधार अनिल कुंबळेच्या अध्यक्षतेखालील आयसीसीच्या क्रिकेट समितीने शुकवारी खेळपट्टीच्या दर्जाबाबत (विशेषत: खेळपट्ट्या स्थानिक संघांना अनुकूल तयार करणे) चिंता व्यक्त केली. समितीने कसोटी क्रिकेटबाबत अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. त्यात यजमान देश आपल्या संघाला अनुकूल खेळपट्ट्या तयार करण्याच्या प्रथेवर चिंता व्यक्त करण्यात आली. आयसीसीचे चेअरमन शशांक मनोहर यांचे गृहमैदान असलेल्या नागपूरमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यादरम्यानचा कसोटी सामना केवळ अडीच दिवसांमध्ये संपला होता. यावर टीकेची झोड उठली होती. आयसीसीच्या खेळपट्टी व मैदान समितीने त्यासाठी अधिकृत ताकीद दिली होती.