वुशूवर हसणारे आता खेळात रुची घेत आहेत - प्रवीण कुमार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2019 12:57 AM2019-10-29T00:57:31+5:302019-10-29T00:57:40+5:30
युवा खेळाडू आणि त्यांच्या आई-वडिलांकडून खेळाबाबत सतत विचारणा होत आहे.
नवी दिल्ली : ‘कधी काळी माझे मित्र वुशू खेळावर हसायचे. हा कुठला खेळ, असे हिणवायचे. विश्व चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण जिंकल्यापासून मात्र मला सन्मान मिळत आहे. आई-वडील मुलांना वुशू खेळात पाठवीत असल्याची माहिती या खेळाचा चॅम्पियन खेळाडू प्रवीण कुमार याने दिली.
हरियाणाचा प्रवीण म्हणाला,‘मी वुशू खेळायला लागलो तेव्हापासून प्रत्येक रात्री या खेळाचे सुवर्ण जिंकण्याच्या विचार मनात आणून झोपी जात होतो. मागच्या आठवड्यात शांघायमध्ये विश्व चॅम्पियनशिपचे सुवर्ण पदक जिंकल्यापासून मला अािण माझ्या खेळाला ओळख लाभली.’
प्रवीणने या खेळातील बारकावे भारतीय क्रीडा प्राधिकरणात शिकले. तो पुढे म्हणाला, ‘माझ्या आई-वडिलांना या खेळाची काहीही माहिती नव्हती. माझे मित्र खेळाची टर उडवायचे. मी त्यांना वुशूचे व्हिडिओ दाखवायचा तेव्हा ते माझ्यावर हसायचे, नंतर या खेळातील फाईट्स पाहून काहींना रुची येऊ लागली. आशियाई क्रीडा स्पर्धा आणि विश्व चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकण्याची कामगिरी करायचीच, असे मी स्वत:शी निर्धार केला होता. आता पदक जिंकल्यानंतर अनेक जण फोन करून तर काही प्रत्यक्ष भेटीला येत या खेळाची सविस्तर माहिती जाणून घेत आहेत.’
युवा खेळाडू आणि त्यांच्या आई-वडिलांकडून खेळाबाबत सतत विचारणा होत आहे. याचा सराव नेमका कसा आणि कुठून सुरू करावा, याबाबत जाणून घेणाऱ्यांची संख्या वाढली. माझे सिनियर प्रमोद कटारिया यांनी हरियाणात तसेच दिल्लीत काही खेळाडूंनी वुशू अकादमी सुरू केली असल्याची माहिती भारतीय सेनेचा जवान प्रवीणने दिली.
सेनादलात माझे कोच आणि मेंटरची फार मोलाची साथ लाभल्याचे सांगून प्रवीण म्हणाला, ‘कोच आणि मेंटरने माझा आत्मविश्वास वाढविला. तू हे करू शकतोस, असे दोघांचेही मत असायचे. मी मेहनत घेतली. दोन महिन्याआधी निर्धार केला. मेडल मिळणार असेल तर ते सुवर्णच असावे, असा मनोमन निर्धार कायम असल्यामुळे यश पदरी पडले.’