स्मिथ, बेलीची शतके, आॅस्ट्रेलिया विजयी

By admin | Published: January 13, 2016 04:00 AM2016-01-13T04:00:55+5:302016-01-13T04:00:55+5:30

कर्णधार स्टीव्हन स्मिथ आणि जॉर्ज बेली यांनी झळकावलेल्या शतकांच्या जोरावर आॅस्ट्रेलियाने मंगळवारी खेळल्या गेलेल्या एकदिवसीय लढतीत भारताचा ५ गडी राखून पराभव केला

Smith, belly centuries, Australia won | स्मिथ, बेलीची शतके, आॅस्ट्रेलिया विजयी

स्मिथ, बेलीची शतके, आॅस्ट्रेलिया विजयी

Next

पर्थ : कर्णधार स्टीव्हन स्मिथ आणि जॉर्ज बेली यांनी झळकावलेल्या शतकांच्या जोरावर आॅस्ट्रेलियाने मंगळवारी खेळल्या गेलेल्या एकदिवसीय लढतीत भारताचा ५ गडी राखून पराभव केला व पाच सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. रोहित शर्माची नाबाद दीडशतकी खेळी अखेर व्यर्थच ठरली. मालिकेतील दुसरा सामना १५ जानेवारी रोजी ब्रिस्बेन येथे खेळला जाईल.
भारताने रोहित (नाबाद १७१ धावा, १६३ चेंडू, १३ चौकार, ७ षटकार) आणि विराट कोहली (९१) यांनी दुसऱ्या विकेटसाठी केलेल्या विक्रमी २०७ धावांच्या भागीदारीच्या जोरावर ३ बाद ३०९ अशी दमदार मजल मारली. रोहित व कोहली यांची भागीदारी दुसऱ्या विकेटसाठी आॅस्ट्रेलियाविरुद्ध भारताची सर्वोच्च भागीदारी ठरली. या दोघांनी आज सचिन तेंडुलकर व व्ही.व्ही.एस. लक्ष्मण यांनी २००१मध्ये इंदूरमध्ये नोंदवलेल्या १९९ धावांच्या भागीदारीचा विक्रम मोडला.
प्रत्युत्तरात खेळताना आॅस्ट्रेलियाने स्मिथची (१४९) कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी आणि त्याने पहिल्याच चेंडूवर नशीबवान ठरलेला बॅलीसोबत (११२) तिसऱ्या विकेटसाठी केलेल्या विक्रमी २४२ धावांच्या भागीदारीच्या जोरावर ४९.२ षटकांत ५ गड्यांच्या मोबदल्यात विजयी लक्ष्य गाठले. स्मिथ व बेली यांची भागीदारी आॅस्ट्रेलियातर्फे तिसऱ्या विकेटसाठी नोंदवलेली सर्वोत्तम भागीदारी ठरली. विजयासाठी २ धावांची गरज असताना बाद झालेल्या स्मिथने १३५ चेंडूंना सामोरे जाताना ११ चौकार
व २ षटकार ठोकले. बॅलीच्या १२० चेंडूंच्या खेळीमध्ये ७ चौकार व २ षटकारांचा समावेश आहे.
भारतातर्फे पदार्पणाची लढत खेळणारा डावखुरा वेगवान गोलंदाज बरिंदर सरण सर्वाधिक यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने ५६ धावांच्या मोबदल्यात ३ बळी घेतले. रोहितने १६३ चेंडूंच्या खेळीदरम्यान १३ चौकार व ७ षटकार ठोकले. त्याने नववे वन-डे शतक झळकावताना अनेक विक्रम नोंदवले. त्याने आॅस्ट्रेलियाविरुद्ध आॅस्ट्रेलियात सर्वोच्च वैयक्तिक स्कोअर नोंदवला. हा विक्रम यापूर्वी विंडीजचे महान फलंदाज सर व्हिव्हियन रिचर्ड््स यांच्या नावावर होता. त्यांनी ३७ वर्षांपूर्वी १५३ धावांची खेळी केली होती.
लक्ष्याचा पाठलाग करताना आॅस्ट्रेलियाची सुरुवात निराशाजनक झाली. त्यांची २ बाद २१ अशी अवस्था झाली होती. सलामीची जोडी अ‍ॅरोन फिंच (८) आणि डेव्हिड वॉर्नर (५) यांना सरणने माघारी परतवले. बॅली नशीबवान ठरला. सरणच्या गोलंदाजीवर लेगसाईडला खेळण्याच्या प्रयत्नात चेंडू ग्लोव्ह्जला चाटून धोनीच्या ग्लोव्ह्जमध्ये विसावला. पंचांनी मात्र त्याला नाबाद ठरवले. त्यानंतर बॅलीने कर्णधार स्मिथच्या साथीने डाव सावरला. या दोघांनी भारताचा अव्वल फिरकीपटू रविचंद्रन आश्विनला (६८) लक्ष्य केले. आॅस्ट्रेलियाला अखेरच्या १० षटकांमध्ये विजयासाठी केवळ ६१ धावांची गरज होती. आश्विनच्या गोलंदाजीवर आक्रमक फटका खेळण्याच्या प्रयत्नात बॅली सीमारेषेवर तैनात भुवनेश्वरकडे झेल देऊन माघारी परतला. त्यानंतर आश्विनने मॅक्सवेललाही (०६) तंबूचा मार्ग दाखविला. स्मिथ डावाच्या अखेरच्या षटकातील सरणच्या पहिल्याच चेंडूवर कोहलीकडे झेल देऊन तंबूत परतला. त्यानंतर जेम्स फॉकनरने एकेरी धाव वसूल करून आॅस्ट्रेलियाला विजयावर शिक्कामोर्तब करून दिले.
मिशेल मार्श १२ धावा काढून नाबाद राहिला. तत्पूर्वी, कोहलीचे शतक हुकले. त्याने ९७ चेंडूंना सामोरे जाताना ९ चौकार व १ षटकार ठोकला. रोहितने डेथ ओव्हर्समध्ये आक्रमक फलंदाजी केली. त्यामुळे भारताने अखेरच्या ५ षटकांत ६१ धावा वसूल केल्या. दीडशतकी खेळीदरम्यान रोहितने आॅस्ट्रेलियाविरुद्ध केवळ १९ डावांमध्ये एक हजार धावा पूर्ण केल्या. सचिन तेंडुलकरच्या तुलनेत रोहितने एक डाव कमी असतानाच हा पराक्रम केला. (वृत्तसंस्था)

कमनशिबी
आॅस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या वन-डेमध्ये भारताचा दिग्गज सलामीवीर रोहित शर्माच्या नाबाद दीड शतकी खेळीनंतरही भारतीय संघाला विजय मिळवता आला नाही. भारताने ३०९ धावांची दमदार मजल मारली, पण गोलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीमुळे पाहुण्या संघाला पाच गड्यांनी पराभव स्वीकारावा लागला.
रोहितने पर्थमधील वाका स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या वन-डेमध्ये शानदार १७१ धावांची नाबाद शतकी खेळी केली, पण भारताला पराभव स्वीकारावा लागला.
२०१५ च्या सुरुवातीला आॅस्ट्रेलिया दौऱ्यावर रोहितने शतकी खेळी केली होती, पण त्यावेळीही भारताला पराभव स्वीकारावा लागला होता. २०१६ च्या सुरुवातीला रोहितने पुन्हा एकदा शतकी खेळी केली आणि यावेळीही भारताला पराभवाला सामोरे जावे लागले. २८ वर्षीय रोहितने १८ जानेवारी २०१५ रोजी आॅस्ट्रेलियाविरुद्ध मेलबोर्नमध्ये १३९ चेंडूंना सामोरे जाताना ९ चौकार व ४ षटकारांच्या मदतीने १३८ धावा फटकाल्या होत्या. भारताने ८ बाद २६७ धावांची मजल मारली होती. प्रत्युत्तरात खेळताना आॅस्ट्रेलियाने ६ बाद २६९ धावा फटकावताना ४ गडी राखून विजय मिळवला होता. योगायोग असा की त्यावेळी २०१५ मध्ये रोहितचा तो पहिला वन-डे सामना होता आणि आॅस्ट्रेलियाविरुद्ध आॅस्ट्रेलियात खेळला गेला होता.
त्याचप्रमाणे यंदा २०१६ च्या सुरुवातीला रोहितने आॅस्ट्रेलियाविरुद्ध आॅस्ट्रेलियात शतकी खेळी केली,
पण टीम इंडियाला पराभव स्वीकारावा लागला.
रोहितने १६३ चेंडूंमध्ये १३ चौकार व ७ षटकारांच्या साहाय्याने नाबाद १७१ धावांची विक्रमी खेळी केली, पण सामन्याच्या निकालानंतर रोहित निराश झाला.

डीआरएस प्रणालीचा फटका : धोनी
महेंद्रसिंह धोनीने वादग्रस्त डीआरएस प्रणालीच्या उपयोगाबाबत भारताच्या उदासीन धोरणाच्या प्रतिमेला धक्का बसू न देता, या प्रणालीचा वापर करीत नसल्याचा संघाला फटका बसत असल्याचे कबूल केले. आॅस्ट्रेलियाची २ बाद २१ अशी स्थिती असताना बरिंदर सरणच्या गोलंदाजीवर चेंडू बेलीच्या ग्लोव्हजला चाटून धोनीच्या ग्लोव्हजमध्ये विसावला. स्निकोमीटरमध्ये चेंडू बेलीच्या ग्लोव्हजला चाटून आल्याचे स्पष्ट झाले. धोनीने अपील केले, पण गोलंदाजाची त्याला आवश्यक ती साथ लाभली नाही. पंच रिचर्ड कॅटेलबोरोग यांनी फलंदाजाच्या बाजूने निर्णय दिला. पंचांनी अधिक अचूक निर्णय द्यावेत, असे माझे वैयक्तिक मत असल्याचे धोनीने स्पष्ट केले. धोनी पुढे म्हणाला,‘डीआरएस प्रणालीमध्ये काही उणिवा आहेत. प्रणाली तयार करणाऱ्यांनी यात त्रुटी असल्याचे मानले आहे.’
फिरकीपटू रविचंद्रन आश्विन आणि रवींद्र जडेजासाठी आजचा दिवस वाईट ठरेल, याचा विचारही केला नव्हता.

लक्ष्य आव्हानात्मक होते : बेली
पाहुण्या संघाने दिलेले ‘लक्ष्य आव्हानात्मक होते आणि आम्ही अखेपर्यंत लढत देण्याचा निर्णय घेतला होता. आमच्या संघात चांगले आक्रमक फलंदाज आहेत,
याची आम्हाला कल्पना होती असे आॅस्ट्रेलियाचा फलंदाज जॉर्ज बेलीने पत्रकार परिषदेत सांगितले. बेली म्हणाला, डीआरएस प्रणाली लागू असती, तर माझ्याविरुद्ध पहिल्या वन-डे सामन्यादरम्यान पहिल्या चेंडूवरील भारतीय खेळाडूंचे अपील अधिक रंजक झाले असते. वाकाच्या पाटा खेळपट्टीवर रोहित शर्माची नाबाद १७१ धावांची खेळी अखेर व्यर्थच ठरली.
बेली पहिल्या चेंडूवर बाद झाला असता. कारण, बरिंदर सरणचा चेंडू त्याच्या ग्लोव्हजला चाटून यष्टिरक्षक धोनीच्या ग्लोव्हजमध्ये विसावला. पंचांना त्याचा अंदाज घेता आला नाही. बेली म्हणाला,‘माझ्या मते चेंडू थाय गार्डला चाटून गेला. डीआरएस लागू असते, तर या निर्णयाबाबत रंगत अनुभवता आली असती. ३१० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कसलेच दडपण नव्हते.’ आॅस्ट्रेलियाने कर्णधार स्टिव्हन स्मिथ (१४९) आणि बेली (११२) यांच्या शतकांच्या जोरावर मंगळवारी खेळल्या गेलेल्या सलामी लढतीत विजय मिळवला.

नंबर गेम
१७१* या रोहित शर्माच्या आॅस्ट्रेलियात पाहुण्या फलंदाजाने केलेल्या सर्वोच्च धावा आहेत. याशिवाय आॅस्ट्रेलियात झालेली पाचव्या क्रमांकाची धावसंख्या आहे. यापूर्वी आॅस्ट्रेलियाविरुध्द वेस्ट इंडिजच्या व्हिव्ह. रिचर्डसने केलेल्या १५३* या सर्वोच्च धावा होत्या. हा विक्रम आता रोहीतच्या नावावर आहे. भारतीय फलंदाजाने आशियाबाहेर केलेल्या या तिसऱ्या क्रमांकाच्या धावा आहेत.
१९ डाव खेळून रोहीतने आॅस्ट्रेलियाविरुध्द हजार धावांचा टप्पा ओलांडला. यातही तो इतरांपेक्षा सरस ठरला. सचिन तेंडुलकर आणि ब्रायन लारा या दोघांनी हा टप्पा गाठायला २0 इनिग्ज खेळल्या होत्या.
७७.३७ धावा प्रति बळी अशी आजच्या सामन्यात सरासरी राहीली. आॅस्ट्रेलियातील ही चौथ्या क्रमांकाची सरासरी आहे. १९९१-९२ साली पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज यांच्या सामन्यात २२0.५0 धावा प्रति बळी अशा धावा गेल्या होत्या.
२०० पेक्षा अधिक धावांची दोन भागीदाऱ्या एका सामन्यात होण्याची ही पहिलीच वेळ आहे. रोहीत आणि विराट यांच्यात २0७ धावांची तर स्टीव्हन स्मिथ आणि जॉर्ज बेली यांच्यात २४२ धावांची आज भागीदारी झाली.
०२ सलग शतके ठोकून स्टीव्ह स्मिथने आॅस्ट्रेलियाला भारताविरुध्द विजय मिळवून दिला आहे. वर्ल्डकपमधील सेमीफायनलमध्ये त्याने १0५ धावा करुन भारताविरुध्द जिंकून दिले होते. त्यानंतर आज विजयी शतकी खेळी केली.
२८२ धावा स्टीव्ह स्मिथने भारताविरुध्दच्या तीन सामन्यात केलेल्या आहेत.

धावफलक
भारत : रोहित शर्मा नाबाद १७१, शिखर धवन झे. मार्श गो. हेजलवूड ९, विराट कोहली झे. फिंच गो. फॉकनर ९१, महेंद्रसिंह धोनी झे. बोलँड गो. फॉकनर १८, रवींद्र जडेजा नाबाद १०. अवांतर :१०. एकूण : ५० षटकांत ३ बाद ३०९. बाद क्रम : १-३६, २-२४३, ३-२८६. गोलंदाजी : हेजलवूड १०-०-४१-१, पॅरिस ८-०-५३-०, मिशेल ९-०-५३-०, बोलँड १०-०-७४-०, फॉकनर १०-०-६०-२, मॅक्सवेल ३-०-२२-०.
आॅस्ट्रेलिया : अ‍ॅरोन फिंच झे. व गो. सरण ८, डेव्हिड वॉर्नर झे. कोहली गो. सरण ५, स्टीव्हन स्मिथ झे. कोहली गो. सरण १४९, जॉर्ज बेली झे. भुवनेश्वर गो. आश्विन ११२, ग्लेन मॅक्सवेल झे. धवन गो. आश्विन ६, मिशेल मार्श नाबाद १२, जेम्स फॉकनर नाबाद १. अवांतर : १७. एकूण : ४९.२ षटकांत ५ बाद ३१०. बाद क्रम : १-९, २-२१, ३-२६३, ४-२७३, ५-३०८. गोलंदाजी : सरण ९.२-०-५६-३, भुवनेश्वर ९-०-४२-०, रोहित १-०-११-०, यादव १०-०-५४-०, जडेजा ९-०-६१-०, आश्विन ९-०-६८-२, विराट २-०-१३-०.

Web Title: Smith, belly centuries, Australia won

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.