स्मिथ ‘सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू’
By Admin | Published: December 23, 2015 11:53 PM2015-12-23T23:53:20+5:302015-12-23T23:53:20+5:30
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) बुधवारी जाहीर केलेल्या वार्षिक पुरस्कार यादीत आॅस्ट्रेलियाचा खेळाडू स्टीव्ह स्मिथ हा सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू आणि कसोटीपटू ठरला
दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) बुधवारी जाहीर केलेल्या वार्षिक पुरस्कार यादीत आॅस्ट्रेलियाचा खेळाडू स्टीव्ह स्मिथ हा सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू आणि कसोटीपटू ठरला. आॅस्ट्रेलिया आणि द. आफ्रिकेच्या खेळाडूंनी पुरस्कारांत आघाडी घेतली तर भारताची झोळी मात्र रिकामीच राहिली.
वर्षाचा सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून सर गारफिल्ड सोबर्स ट्रॉफी पटकविणारा स्टीव्ह हा आॅस्ट्रेलियाचा चौथा तसेच एकूण ११ वा खेळाडू ठरला. याआधी रिकी पाँटिंग (२००६ आणि ०७), मिशेल जॉन्सन (२००९ व २०१४), मायकेल क्लार्क (२०१३) यांनी हा सन्मान पटकविला होता. राहुल द्रविड (२००४) अॅण्ड्र्यू फ्लिन्टॉफ आणि जॅक कॅलिस (२००५), शिवनारायण चंदरपॉल (२००८), सचिन तेंडुलकर (२०१०), जोनाथन ट्रॉट (२०११) आणि कुमार संगकारा (२०१२) यांनीही हा मान मिळविला होता.
स्मिथ याला यंदाचा सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूचा देखील पुरस्कार मिळाला. याआधी द्रविड २००४, कॅलिस २००५, पाँटिंग २००६, संगकारा २०१२, क्लार्क २०१३, आणि जॉन्सन २०१४ यांना एकाच वर्षी दोन पुरस्कार मिळाले होते. स्टीव्ह या यादीत सातवा खेळाडू ठरला. द. आफ्रिकेचा कर्णधार एबी डिव्हिलियर्स याला सलग दुसऱ्यांदा वर्षातील सर्वोत्कृष्ट वन-डे खेळाडूचा मान मिळाला. स्मिथ २०१५च्या विश्वविजेत्या आॅस्ट्रेलिया संघात होता. रिचर्ड केटलबरो हे सलग तिसऱ्यांदा आयसीसीचे सर्वोत्कृष्ट पंच ठरले. भारताचा माजी कर्णधार आणि आयसीसीच्या क्रिकेट समितीचा प्रमुख अनिल कुंबळे याच्या नेतृत्वाखालील समितीने खेळाडूंची निवड केली.
>> संघाचे यश हे माझे लक्ष्य राहिले. जगात इतके महान खेळाडू असताना मला हा पुरस्कार मिळाला याबाबत स्वत:ला धन्य मानतो. आपल्याच भूमीत विश्वचषक जिंकणे ‘खास’ होते. आता पुन्हा एकदा सन्मान मिळाला.
- स्टीव्ह स्मिथ, कर्णधार, आॅस्ट्रेलिया.
>सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू व कसोटीपटू : स्टीव्ह स्मिथ, आॅस्ट्रेलिया,
सर्वोत्कृष्ट टी-२० खेळाडू : फाफ डुप्लेसिस, द. आफ्रिका.
सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटपटू : मेग लेनिंग आॅस्ट्रेलिया, वेस्ट इंडिजच्या सर्वोत्कृष्ट महिला टी-२० क्रिकेटपटू : स्टेफनी टेलर, वेस्ट इंडिज.
सर्वोत्कृष्ट प्रतिभावान खेळाडू : जोश हेजलवूड, आॅस्ट्रेलिया
सर्वोत्कृष्ट असोसिएट व अॅफिलिएट खेळाडू : खुर्रम खान, यूएई
स्पिरिट आॅफ क्रिकेट पुरस्कार : ब्रेन्डन मॅक्युलम, न्यूझीलंड,
आयसीसी सर्वोत्कृष्ट अंपायर : रिचर्ड केटलबरो.