स्मिथची झुंजार खेळी

By admin | Published: December 27, 2014 02:27 AM2014-12-27T02:27:11+5:302014-12-27T02:27:11+5:30

कर्णधार स्टीव्हन स्मिथने झुंजार खेळी करीत सलग तिसऱ्या शतकाकडे वाटचाल सुरू ठेवल्याने भारताविरुद्ध तिस-या कसोटीत

Smith's batting | स्मिथची झुंजार खेळी

स्मिथची झुंजार खेळी

Next

मेलबोर्न : कर्णधार स्टीव्हन स्मिथने झुंजार खेळी करीत सलग तिस-या शतकाकडे वाटचाल सुरू ठेवल्याने भारताविरुद्ध तिसऱ्या कसोटीत पहिल्या दिवसअखेर आॅस्ट्रेलियाला ५ बाद २५९ धावांपर्यंत मजल गाठता आली. भारतीय गोलंदाजही प्रभावी ठरल्यामुळे उभय संघांची कामगिरी समतोल झाली.
स्मिथने नाणेफेक जिंकताच फलंदाजीचा निर्णय घेत कलात्मक फटकेबाजीमुळे भारतीय गोलंदाजांना हैराण केले. चढउताराच्या खेळात स्मिथ ७२ धावांवर नाबाद राहिला. डेव्हिड वॉर्नर शून्यावर बाद होताच भारतीय गोटात आनंदाचे वातावरण होते पण ख्रिस रॉजर्स ५७ आणि शेन वाटसन ५२ यांनी अर्धशतके झळकवित दुसऱ्या गड्यासाठी ११५ धावांची भागीदारी केली.
यानंतर यजमानांचे तीन गडी झटपट बाद झाल्याने भारताला सामन्यात परतण्याची संधी मिळाली. दुसरीकडे कर्णधाराला समर्थपणे साथ देत ब्रॅड हॅडिन २३ धावांवर नाबाद आहे. भारताकडून उमेश यादव आणि मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी दोन तसेच अश्विनने एक गडी बाद केला. ईशांतनेही टिच्चून मारा केला पण त्याला गडी बाद करता आला नाही.
वॉर्नरचा अडथळा दूर सारणाऱ्या भारताने वाटसनला मात्र ३७ धावांवर जीवदान दिले. स्लिपमध्ये धवनने त्याचा झेल सोडला. दुसऱ्या सत्रात भारतीय गोलंदाजांनी यजमान फलंदाजांना धावा घेणे कठीण केले होते. पण आधीच्या दोन सामन्यात दोन शतके आणि अर्धशतकासह ३७५ धावा काढणाऱ्या २५ वर्षाच्या स्मिथने संयमी खेळ केला. स्मिथने आजच दहावे अर्धशतक गाठले शिवाय एका वर्षांत हजार धावांचाही पल्ला गाठला.
वाटसन आणि रॉजर्स यांनी जी ११५ धावांची भागीदारी केली त्यात रॉजर्सने सलग तिसरे व एकूण आठवे अर्धशतक साजरे केले. वाटसनने नऊ डावांत पहिल्या अर्धशतकाची नोंद केली.
आॅस्ट्रेलियाने या सामन्यासाठी संघात दोन बदल केले. मिशेल स्टाकरऐवजी रेयॉन हॅरिस आणि मिशेल मार्शऐवजी ज्यो बर्न्सला खेळविण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघातही दोन बदल करण्यात आले.
वरुण अ‍ॅरोनचे स्थान वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने घेतले तर सलग अपयशी ठरलेल्या रोहित शर्मा याला वगळून लोकेश राहुलला कसोटी पदार्पणाची संधी देण्यात आली. आॅस्ट्रेलियाने अ‍ॅडिलेड येथे पहिला सामना ४८ धावांनी आणि ब्रिस्बेनचा दुसरा सामना चार गड्यांनी जिंकून चार सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी संपादन केली.(वृत्तसंस्था)

Web Title: Smith's batting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.