स्मिथचे विक्रमी चौथे शतक

By Admin | Published: January 8, 2015 01:28 AM2015-01-08T01:28:55+5:302015-01-08T01:28:55+5:30

आॅस्ट्रेलियाचा युवा कर्णधार स्टीव्हन स्मिथ याने चौथ्या कसोटीतही शतकी खेळी केली. सलग चौथ्या शतकासह त्याने सर डॉन ब्रॅडमन व जॅक्स कॅलिस यांच्या विक्रमाशी बरोबरी साधली;

Smith's record fourth century | स्मिथचे विक्रमी चौथे शतक

स्मिथचे विक्रमी चौथे शतक

googlenewsNext

चौथी कसोटी : आॅस्ट्रेलियाचा धावडोंगर, ७ बाद ५७२ धावांवर डाव घोषित; भारत १ बाद ७१ धावा
सिडनी : आॅस्ट्रेलियाचा युवा कर्णधार स्टीव्हन स्मिथ याने चौथ्या कसोटीतही शतकी खेळी केली. सलग चौथ्या शतकासह त्याने सर डॉन ब्रॅडमन व जॅक्स कॅलिस यांच्या विक्रमाशी बरोबरी साधली; शिवाय संघाचा ७ बाद ५७२ असा धावांचा डोंगर उभारून दुसऱ्या दिवशी भारतापुढे आव्हान उभे केले.
भारतानेही फॉर्ममध्ये असलेल्या मुरली विजयला शून्यावर गमावल्यानंतरही न डगमगता दिवसअखेर १ बाद ७१ अशी वाटचाल केली. विजय तिसऱ्याच चेंडूवर बाद झाला; पण सलामीचा लोकेश राहुल नाबाद ३१ आणि रोहित शर्मा नाबाद ४० यांनी चिवट खेळी केली. भारत अद्याप ५०१ धावांनी मागे आहे. एका मालिकेत सलग ४ शतके ठोकणारा स्मिथ हा तिसरा खेळाडू ठरला. करिअरमधील आठवे शतक साजरे करणाऱ्या स्मिथने ११७ धावा ठोकल्या. त्याने २०८ चेंडू टोलवून १५ चौकार मारले. याशिवाय शेन वॉटसन ८१, शॉन मार्श ७३ व ज्यो बर्न्स ५८ यांचीही अर्धशतके लक्षवेधी ठरली. एका मालिकेत सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजांत स्मिथ दुसऱ्या स्थानावर आला आहे. २००३-०४मध्ये रिकी पाँटिंग याने भारताविरुद्ध ७०६ धावा काढल्या होत्या.
भारताकडून राहुल लोकेश आणि रोहित यांनी आतापर्यंत ७१ धावांची भागीदारी केली आहे. तिसऱ्या दिवशी त्यांच्याकडून मोठी खेळी अपेक्षित आहे. आॅस्ट्रेलियाने २ बाद ३४८ वरून पुढे खेळ सुरू केला. स्मिथ-वॉटसन यांच्यात तिसऱ्या गड्यासाठी १९६, तर मार्श-बर्न्स यांच्यात पाचव्या गड्यासाठी ११४ धावांची भागीदारी झाली. भारताकडून मोहंमद शमी याने ११२ धावा देऊन सर्वाधिक ५ गडी बाद केले. मार्श १४ धावांवर असताना त्याला बाद करण्याची संधी होती; पण आश्विनच्या चेंडूवर विजयने त्याचा झेल सोडला. (वृत्तसंस्था)

स्मिथने केली ब्रॅडमन, कॅलिस यांची बरोबरी
यजमान संघाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथ याने एका मालिकेत सलग ४ शतके ठोकण्याची विक्रमी कामगिरी केली. या बाबतीत त्याने सर डॉन ब्रॅडमन आणि जॅक्स कालिस यांच्या विक्रमांशी बरोबरी केली. त्याने अ‍ॅडिलेड येथे नाबाद १६२, ब्रिस्बेनमध्ये १३३ आणि मेलबोर्न येथे १९२ धावा केल्या होत्या. सिडनीत त्याने ११७ धावा ठोकल्या. ब्रॅडमन यांनी हा विक्रम १९३१-३२मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केला, तर कॅलिसने २००३-०४मध्ये या विक्रमाशी बरोबरी केली.

माझ्यासाठी विशेष सत्र
सामन्यात धावडोंगर उभारल्याचा आनंद आहे. माझी विक्रमी कामगिरी आणि सामन्यावर पकड मिळविणे, हे कर्णधार म्हणून अभिमानास्पद आहे. आघाडीच्या ६ फलंदाजांनी अर्धशतकाहून अधिक धावा काढण्याची कामगिरी आधी झाली असावी, असे मला वाटत नाही. या सामन्यात सर्वोत्तम कामगिरी करण्याच्या सूचना मी सहकाऱ्यांना दिल्या आहेत. ५००वर धावा ही चांगल्या खेळाची पावती आहे. भारताने चांगली गोलंदाजी केली; पण आम्ही वरचढ ठरलो.
- स्टीव्हन स्मिथ

अधिक धावा दिल्या नाहीत
पाटा खेळपट्टीवर गोलंदाजी करणे कठीण असल्याने आम्ही अधिक धावा मोजल्या, ही टीका योग्य नाही. सिडनीची खेळपट्टी फारच पाटा असल्याने त्यावर गोलंदाजी करणे अवघड काम
आहे. येथे चेंडूची दिशा आणि वेग नियंत्रित करण्यास उशीर लागतो. आॅस्ट्रेलियाने धावडोंगर उभारला, तर आम्हीही तितक्या धावा काढू. या खेळपट्टीवर कुठल्या तंत्राचा अवलंब करावा याची माहिती आहे; पण
फलंदाजांनी चांगली कामगिरी
केली. हा खेळाचा भाग आहे, असे मी मानतो.
- मोहंमद शमी

त्यामुळे स्मिथ झाला नाराज
भारताचा सलामीवीर फलंदाज मुरली विजय बाद झाल्यानंतर मिशेल स्टार्क याने केलेल्या जल्लोषामुळे आॅस्ट्रेलियन कर्णधार स्टिव्ह स्मिथ याने नाराजी व्यक्त केली आहे़ सिडनी कसोटीत अनुभवी वेगवान गोलंदाज मिशेल जॉन्सनऐवजी स्टार्क याला संधी मिळाली आहे़ त्याने डावाच्या तिसऱ्याच चेंडूवर मुरली विजयला बाद केले़ यानंतर त्याने मुरलीकडे रागाने बघितले आणि जल्लोष करायला सुरुवात केली़ यावर स्मिथ याने खेद व्यक्त केला़ खेळाडूला बाद केल्यानंतर गोलंदाजांनी जल्लोष साजरा करावा यात शंका नाही;मात्र जल्लोषालाही काही मर्यादा असतात़ त्यामुळे खेळाडूंनी यापुढे जल्लोष करताना नियम, अटींचा भंग होणार नाही याची काळजी घ्यावी, असेही कर्णधार स्मिथने म्हटले आहे़

चॅपल, क्लार्ककडून कोहलीच्या रणनीतीवर टीका
सिडनी : सिडनीत सुरू असलेल्या चौथ्या कसोटीत कर्णधार विराट कोहली याच्या गोलंदाजीतील बदलाच्या रणनीतीवर आॅस्ट्रेलियाचा माजी खेळाडू इयान चॅपल आणि स्टार क्रिकेटपटू मायकल क्लार्क यांनी टीका केली आहे़ क्लार्क म्हणाला, कोहलीच्या गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाच्या बदलामुळे आश्चर्यचकित झालो़ कारण चहापानानंतर त्याने मोहंमद शमी, उमेश यादव आणि भुवनेश्वर कुमार यांना प्रत्येकी एका षटकाचा स्पेल दिला; मात्र दुसऱ्या बाजूने त्याने आऱ अश्विनची गोलंदाजी सुरूच ठेवली होती़

चुका दुर व्हायला
वेळ लागेल-अरून
भारतीय युवा गोलंदाजांची गोलंदाजी दिवसेंदिवस प्रभावी होत आहे़ असे असले तरी त्यांना आपल्या गोलंदाजीतील चुका दुर करण्यासाठी आणखी वेळ लागेल असे मत टीम इंडियाचे गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरून यांनी व्यक्त केले आहे़

धावफलक
आॅस्ट्रेलिया पहिला डाव : ख्रिस रॉजर्स त्रि. गो. शमी ९५, डेव्हिड वॉर्नर झे. विजय गो. आश्विन १०१, शेन वॉटसन झे. आश्विन गो. शमी ८१, स्टीव्हन स्मिथ झे. साहा गो. यादव ११७, शॉन मार्श झे. साहा गो. शमी ७३, ज्यो बर्न्स झे. राहुल गो. शमी ५८, ब्रॅड हॅडीन नाबाद ९, रेयॉन हॅरिस झे. आश्विन गो. शमी २५, अवांतर १३, एकूण : १५२.३ षटकांत ७ बाद ५७२ धावांवर डाव घोषित. गडी बाद क्रम : १/२००, २/२०४, ३/४००, ४/४१५, ५/५२९, ६/५४६, ७/५७२. गोलंदाजी : भुवनेश्वर ३४-५-१२२-०, यादव १२७-५-१३७-१, शमी २८.३-३-११२-५, आश्विन ४७-८-१४२-१, रैना १६-३-५३-०.
भारत पहिला डाव : मुरली विजय झे. हॅडीन गो. स्टार्क ००, लोकेश राहुल खेळात आहे ३१, रोहित शर्मा खेळत आहे, ४०. एकूण २५ षटकांत १ बाद ७१ धावा. गडी बाद क्रम : १/०. गोलंदाजी : स्टार्क ६-२-१७-१, हॅरिस ७-१-१७-०, हेजलवूड ४-१-१०-०, लियॉन ८-१-२७-०.

Web Title: Smith's record fourth century

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.