...म्हणूनच बोपन्नाला वगळले
By admin | Published: January 4, 2017 03:23 AM2017-01-04T03:23:10+5:302017-01-04T03:23:10+5:30
भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आवडीच्या स्पर्धेची निवड करणाऱ्या खेळाडूंना कडक इशारा देण्यासाठी रोहन बोपन्नाला डेव्हिस कप संघातून वगळण्यात आले, असा दावा
चेन्नई : भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आवडीच्या स्पर्धेची निवड करणाऱ्या खेळाडूंना कडक इशारा देण्यासाठी रोहन बोपन्नाला डेव्हिस कप संघातून वगळण्यात आले, असा दावा अखिल भारतीय टेनिस महासंघाचा (एआयटीए) सूत्रानी केला आहे. बोपन्नाने दुखापतीचे कारण देत स्पेन विरुद्धच्या लढतीतून माघार घेतली होती.
एटीपी टुरमध्ये आपल्या शानदार सर्व्हिससाठी ओळखल्या जाणाऱ्या बोपन्नाने लढतीच्या अखेरच्या दिवशी १८ सप्टेंबर रोजी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यात त्यापूर्वीच्या रात्री तो मित्रांसोबत नृत्य करताना दिसत होता.
एआयटीएच्या सूत्रानी सांगितले की, ‘आम्ही डोळे बंद केलेले नाहीत. जर एखाद्या खेळाडूला देशातर्फे खेळण्यास स्वारस्य वाटत नाही तर तो खेळाडू संघात स्थान मिळवण्याचा हकदार नाही. ती महत्त्वाची लढत होती आणि खेळाडूंनी सांघिक कामगिरीच्या जोरावर आव्हान स्वीकारावे, अशी आम्हाला आशा होती.’
निवड समितीचे अध्यक्ष एस.पी. मिश्रा म्हणाले, बोपन्नाने स्पेन विरुद्धच्या लढतीतून माघार घेण्याच्या निर्णयाची न्यूझीलंड विरुद्धच्या लढतीसाठी संघाची निवड करताना चर्चा झाली. एकेरीतील तीन आणि दुहेरीतील दोन खेळाडूंची निवड करण्याचे निर्देश देण्यात आले होते.’
बोपन्ना दुहेरीमध्ये भारताचा सर्वोत्तम मानांकन असलेला खेळाडू आहे. पण अनुभवी लिएंडर पेसला प्राधान्य देण्यात आले.
एआयटीएचे महासचिव हिरणमय चॅटर्जी यांनी संकेत दिले की, बोपन्नाने स्पेन विरुद्धच्या लढतीतून माघार घेण्याचे प्रकरण होते. सर्व डेव्हिस कप खेळाडू निवड समितीत आहेत. त्यांनी सर्व प्रकरणावर चर्चा केली. त्यात न्यूझीलंड विरुद्धचा निकाल आणि रोहनची स्पेन विरुद्धच्या लढतीतून माघार घेण्याच्या निर्णयाचा समावेश होता. (वृत्तसंस्था)
कुणी असा विचार करेल, याचे मला आश्चर्य वाटते. यूएस ओपनच्या मिश्र दुहेरीच्या लढतीनंतर फिजिओकडे गेलो. त्यांनी गुडघ्यावर सूज असल्यामुळे १० दिवसांची विश्रांती घेण्याचा सल्ला दिला. मी सुरुवातीलाच १० दिवसांच्या विश्रांतीची गरज असल्याचे सांगितले होते.
नृत्य करीत असल्याच्या व्हिडिओबाबत बोलताना बोपन्ना म्हणाला, ‘मी एकावेळी १०० मीटरची शर्यत धावू शकतो, पण पाच सेट््समध्ये सातत्याने खेळणे शक्य होत नाही. मी धावू शकत नाही, चालू शकत नाही किंवा उडी मारू शकत नाही, असे मी कधीच म्हटले नव्हते. मी १०० टक्के फिट नव्हतो. एक टेनिस खेळाडू म्हणून मला सर्व बाबींचा विचार करावा लागतो. चंदीगडप्रमाणे येथेही वेळेवर एकेरीत खेळावे लागले असते तर काय केले असते. त्यामुळे मी माघार घेतली. सर्व खेळाडूंनी हे समजून घ्यायला हवे.’