सोफिया सीव्हिंगने 'इंडिया मास्टर्स पिकलबॉल' स्पर्धेत मारली बाजी! मिळवलं पहिल्या हंगामाचं जेतेपद
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2024 11:30 IST2024-10-28T11:26:20+5:302024-10-28T11:30:01+5:30
अव्वल मानांकित चीनी तैपेईच्या काओ चुआन हिचा ११-३, ११-२ असा उडवला धुव्वा

सोफिया सीव्हिंगने 'इंडिया मास्टर्स पिकलबॉल' स्पर्धेत मारली बाजी! मिळवलं पहिल्या हंगामाचं जेतेपद
Sofia Sewing: PWR DUPR India Masters Pickleball Championship स्पर्धेच्या पहिल्याच हंगामात तिसरे मानांकन असलेली सोफिया सीव्हिंग हिने दमदार विजय मिळवला. तिने अव्वल मानांकित चीनी तैपेईच्या काओ पै चुआन हिचा ११-३, ११-२ असा सरळ गेममध्ये पराभव केला. प्रो पिकलबॉलच्या पहिल्या हंगामाचे आयोजन रविवारी DLTA स्टेडियममध्ये करण्यात आले होते. या स्पर्धेत अमेरिकेच्या सोफिया सीव्हिंगने अनुभव चुआन हिचा पराभव केला.
सुरुवातीच्या काळात अमेरिकेची सोफिया सीव्हिंग आणि काओ पै चुआन दोघीही अतिशय संयमाने खेळत होते. दोघींनाही कुठलीही जोखीम पत्करायची नव्हती. अखेर काओ चुआनने गुणांचे खाते उघडून २-० पर्यंत मजल मारली. त्यानंतर खेळाला गती प्राप्त झाली आणि सामना रंगतदार झाला. २-२ असे गुण असताना अचानक सीव्हिंगने हळूहळू आघाडी घेतली आणि मग २-१० पर्यंत पुढे गेली. त्यानंतर काओने एक गुण मिळवला. पण अखेर शेवटचा गुण मिळवत सीव्हिंगने पहिला गेम ११-३ ने जिंकला.
पहिल्या गेमनंतर दोघींचे एंड बदलण्यात आले. त्यातून तरी काओला फायदा होईल अशी अपेक्षा होती. पण सीव्हिंगने काओला डोकं वर काढू दिले नाही. सुरुवातीलाच तिने ५-० ची आघाडी घेतली. त्यानंतर काओने २ गुण मिळवले. पण अखेर सीव्हिंगच्या झंझावातापुढे काओचा निभाव लागला नाही. ११-२ ने दुसरा गेमही जिंकत तिने सामना खिशात घातला.