सूर गवसल्याने समाधान : युवराज
By Admin | Published: March 3, 2016 04:12 AM2016-03-03T04:12:31+5:302016-03-03T04:12:31+5:30
श्रीलंकेविरुद्ध ५ गडी राखून मिळवलेल्या विजयात ३५ धावांची आक्रमक खेळी करणारा भारताचा डावखुरा शैलीदार फलंदाज युवराजसिंग याने सूर गवसला असल्याचे म्हटले आहे.
मिरपूर : श्रीलंकेविरुद्ध ५ गडी राखून मिळवलेल्या विजयात ३५ धावांची आक्रमक खेळी करणारा भारताचा डावखुरा शैलीदार फलंदाज युवराजसिंग याने सूर गवसला असल्याचे म्हटले आहे.
या वर्षी जानेवारीत टी-२० संघात पुनरागमन करणाऱ्या युवराजने विराट कोहली (नाबाद ५६ धावा) याच्या साथीने महत्त्वपूर्ण ५१ धावांची भागीदारी केली. युवराज म्हणाला, ‘‘पुन्हा सूर गवसला असल्याचे वाटत आहे. मला आता सकारात्मक असल्याची जाणीव होते. मी माझा खेळ पुन्हा करीत आहे. मला खेळपट्टीवर वेळ व्यतीत करण्याची आवश्यकता होती. मी जास्तीत जास्त फलंदाजी करण्याचा प्रयत्न करीत होतो. हळूहळू लय मिळवत असल्याचे मला जाणवते.’’
युवराजने १८ चेंडूंत ३५ धावा केल्या. त्यांत ३ षटकार आणि ३ चौकार मारले. युवराजने म्हटले, ‘‘कोणत्या गोलंदाजांवर हल्ला करायचा अथवा नाही, याची मी योजना आखत होतो. डावखुऱ्या फिरकी गोलंदाजांवर हल्ला करायचा, हे मी ठरवले. कारण, डावखुरा कोणताही फलंदाज अशा गोलंदाजांवर षटकार ठोकू शकतो. त्यामुळे मीही असेच केले.’’(वृत्तसंस्था)
> संघासाठी योगदान दिल्याचा आनंद : विराट
भारतीय क्रिकेटचा ‘हिरो’ आणि आशिया कपमध्ये सलग दुसऱ्यांदा सामनावीर ठरलेल्या विराट कोहलीने आपला फॉर्म आणि संघाच्या विजयातील महत्त्वाची भूमिका पार पाडल्याने खूष असल्याचे सांगितले.
विराट म्हणाला, ‘‘१६ धावांत २ विकेट पडल्याने पुन्हा एकदा प्रतिकूल स्थिती होती. चेंडूला चांगल्या रीतीने स्ट्राइक करीत असल्याची आपल्याला जाणीव होती. त्यामुळे मी चेंडूला फटकावून अन्य फलंदाजांवरील दबाव कमी करण्याचा प्रयत्न करीत आहे. या सामन्यात नुवान कुलशेखरा आणि अँजेलो मॅथ्यूज
खूप चांगली गोलंदाजी करीत होते. त्यामुळे क्रीझबाहेर येऊन खेळण्याची आमची योजना होती.’’
> पराभवाने आत्मविश्वास कमी होतोय.. : मॅथ्यूज
मीरपूर : श्रीलंकेचा कार्यवाहक कर्णधार अँजोलो मॅथ्यूज याने टी-२0 वर्ल्डकपआधी सलग पराभवाने संघाचा आत्मविश्वास कमी होत असल्याचे म्हटले आहे.
भारताकडून पाच गड्यांनी झालेल्या पराभवानंतर मॅथ्यूज म्हणाला, ‘‘पराभवाने विशेष नुकसान होत आहे. विशेषत: आमच्या संघाच्या आत्मविश्वास आणि मनोधैर्यावर. सलग पराभव पचवणे कठीण आहे. आम्ही अजूनही आपली सर्वोत्तम कामगिरी केली नाही. फलंदाजांची फळीही अपयशी ठरली आहे. टी-२0 वर्ल्डकप उंबरठ्यावर आहे, त्यामुळे आम्हाला लवकरच चुकीतून धडा घ्यावा लागेल.’’ टी-२0 तील भारताच्या यशाचे गुपित हे योग्य खेळाडूंची निवड असल्याचेही मॅथ्यूजने सांगितले.(वृत्तसंस्था)