सोमदेव, पेस, भूपती सज्ज !
By admin | Published: January 5, 2015 03:22 AM2015-01-05T03:22:25+5:302015-01-05T03:22:25+5:30
भारतातील सर्वांत प्रतिष्ठेची व्यावसायिक स्पर्धा असलेल्या चेन्नई ओपन एटीपी टूर स्पर्धेला उद्या, सोमवारपासून सुरुवात होत आहे.
चेन्नई : भारतातील सर्वांत प्रतिष्ठेची व्यावसायिक स्पर्धा असलेल्या चेन्नई ओपन एटीपी टूर स्पर्धेला उद्या, सोमवारपासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेसाठी भारताचा एकेरीतील अव्वल खेळाडू सोमदेव देवबर्मन, दुहेरीतील महान खेळाडू लिएंडर पेस आणि महेश भूपती सज्ज झाले आहेत. ४५ लाख डॉलर रकमेचे बक्षीस असलेल्याया स्पर्धेत नऊ महिन्यांनंतर कोर्टवर पुनरागमन करणाऱ्या लिएंडर पेस आणि महेश भूपती यांचा दुहेरीतील सामना रंगताना पाहायला मिळणार आहे. सोमदेव, पेस आणि भूपती या त्रिकुटाशिवाय चेन्नईतील टेनिस चाहत्यांना जगातील चौथ्या क्रमांकाचा खेळाडू तसेच गतविजेता स्टॅनिसलास वावरिंका याला पुन्हा एकदा बघायला मिळेल. स्वित्झर्लंडच्या या खेळाडूची ही सातवी स्पर्धा असून, त्याला यंदाही विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानले जात आहे. वावरिंका म्हणाला,मला चेन्नईत खेळायला खूप आवडते. येथील वातावरण खूप प्रोत्साहित करणारे असते. त्यामुळेच मी वारंवार या स्पर्धेत सहभागी होत आहे. नव्या वर्षाच्या प्रारंभाला होणारी ही स्पर्धा कारकिर्दीसाठी ‘लकी’ ठरली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नव्या दमाने सुरुवात करायची आहे. वावरिंकाला पहिल्या फेरीत ‘बाय’ देण्यात आला आहे. भूपती आणि साकेत तसेच एन. श्रीराम बालाजी आणि जीवन नेदुनचेझियन या भारतीय जोडीला वाईल्ड कार्डने प्रवेश देण्यात आला आहे. (वृत्तसंस्था)