सौरभ गांगुलीची बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड
By admin | Published: September 24, 2015 07:17 PM2015-09-24T19:17:37+5:302015-09-24T19:25:58+5:30
माजी कर्णधार आणि शैलीदार डावखुरा खेळाडू सौरभ गांगुली याची बंगाल क्रिकेट असोसिशनच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे
ऑनलाइन लोकमत
भारताचा यशस्वी माजी कर्णधार आणि शैलीदार डावखुरा खेळाडू सौरभ गांगुली याची बंगाल क्रिकेट असोसिशनच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. जगमोहन दालमिया यांच्या गेल्या आठवड्यातील निधनानंतर बंगालच्या क्रिकेटची धुरा कोण वाहील हा प्रश्न होता, परंतु सर्वसहमतीने हा निर्णय घेण्यात आल्याचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जाहीर केले.
बंगाल क्रिकेट असोसिएशनमध्ये जवळपास १२१ सदस्य क्लब असून सगळ्या क्लब्जनी एकमताने गांगुलीच्या निवडीस पाठिंबा दिल्याचे सांगण्यात येत आहे. ममता बॅनर्जींनीही हा निर्णय राजकीय नसून सदस्यांच्या सहमतीने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले. अर्थात, बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या सदस्य क्लब्जमध्ये तृणमूलच्या राजकीय नेत्यांचा वरचश्मा आहे. त्यामुळेच कदाचित गेले दोन दिवस सौरभ गांगुली ममता बॅनर्जींच्या संपर्कात होता.
बॅनर्जी यांनी मात्र अधिक वाच्यता न करता, संस्थेच्या सदस्यांनी हा निर्णय घेतल्याचे जाहीर केले आहे. गांगुलीने बंगालच्या क्रिकेटची धुरा वाहणे आव्हात्माक काम असल्याेच सांगताना सगळ्यांच्या सहकार्याने ही जबाबदारी आपण पार पाडू असा विश्वास व्यक्त केला आहे. जगमोहन दालमिया यांचा मुलगा अभिषेक याची सहसचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.