सौरव घोषाल उपांत्य फेरीत
By admin | Published: September 26, 2015 02:49 AM2015-09-26T02:49:02+5:302015-09-26T02:49:02+5:30
भारताचा अव्वल स्क्वॉशपटू सौरव घोषालने आपल्या लौकिकानुसार खेळ करताना भारताचा दुसऱ्या क्रमांकाचा मुंबईकर महेश माणगावकरचे कडवे आव्हान सहजपणे परतावून इंडियन स्क्वॉश
कोलकाता : भारताचा अव्वल स्क्वॉशपटू सौरव घोषालने आपल्या लौकिकानुसार खेळ करताना भारताचा दुसऱ्या क्रमांकाचा मुंबईकर महेश माणगावकरचे कडवे आव्हान सहजपणे परतावून इंडियन स्क्वॉश सर्किटच्या कोलकाता सत्रात उपांत्य फेरी गाठली. उपांत्य सामन्यात सौरवसमोर दक्षिण आफ्रिकेच्या स्टीफन कोप्पींगरचे आव्हान असेल.
एकतर्फी झालेल्या या सामन्यात सौरवने पहिल्या गेमपासून राखलेला आक्रमक पवित्रा अखेरपर्यंत कायम ठेवत केवळ ३५ मिनिटांत महेशचे आव्हान संपुष्टात आणले. या वेळी दबावाखाली आलेल्या महेशचे खेळावरील नियंत्रण सुटले; आणि सौरवने ११-७, ११-३, ११-७ अशी सहज बाजी मारली.
तत्पूर्वी स्टीफनला इजिप्तच्या झाहेद मोहम्मदने झुंजार लढत दिली. या वेळी स्टीफनने कसाबसा पहिला गेम जिंकल्यानंतर आक्रमक फटक्यांची बरसात करत झाहेदला १४-१२, ११-५, ११-७ असे नमवले. तसेच इंग्लंडच्या ख्रिस सिम्पसनने जबरदस्त वर्चस्व राखताना स्कॉटलंडच्या ग्रेग लोब्बानचा केवळ ५१ मिनिटांमध्ये ११-२, ११-५, १२-१० असा फडशा पाडला.