सौरव घोषालची सहज विजयी सलामी
By admin | Published: September 11, 2015 12:31 AM2015-09-11T00:31:38+5:302015-09-11T00:31:38+5:30
भारताचा अव्वल स्क्वॉशपटू सौरव घोषालने इंडियन स्क्वॉश सर्किट स्पर्धेच्या दुसऱ्या सत्रात भारताच्याच कुश कुमारचा धुव्वा उडवून विजयी सलामी दिली. तसेच या स्पर्धेत आता
मुंबई : भारताचा अव्वल स्क्वॉशपटू सौरव घोषालने इंडियन स्क्वॉश सर्किट स्पर्धेच्या दुसऱ्या सत्रात भारताच्याच कुश कुमारचा धुव्वा उडवून विजयी सलामी दिली. तसेच या स्पर्धेत आता केवळ सौरवच्या रुपानेच भारताचे आव्हान टिकून आहे.
क्रिकेट क्लब आॅफ इंडिया (सीसीआय) येथे झालेल्या या सामन्यात सौरवने युवा कुशला स्क्वॉशचे धडे देताना केवळ ३९ मिनिटांत विजयाची नोंद केली. एकतर्फी झालेल्या या सामन्यात सौरवने आक्रमक खेळाचा धडाका करताना कुशला फारशी संधी न देता ११-२, १५-१३, ११-४ असा दणदणीत विजय मिळवला.
त्याचवेळी मुंबईकर महेश माणगावकर आणि हरिंदरपाल सिंग संधू यांचे आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आल्याने भारताच्या आशा आता केवळ सौरववर अवलबून आहेत. नुकताच झालेल्या एनएससीआय सत्रामध्ये अंतिम सामन्यात महेशचा अव्वल खेळाडू इंग्लंडच्या अॅड्रीयन वॉलर विरुध्द पराभव झाला होता. यावेळी महेशने वॉलरला कडवी झुंज दिली. मात्र विजय मिळवण्यात यश न आल्याने त्याला गत अंतिम सामन्यातील वचपा काढता आला नाही. ८१ मिनिटांपर्यंत रंगलेल्या या सामन्यात वॉलरने १३-११, ११-४, ७-११, ११-५ असा विजय मिळवून महेशचे आव्हान संपुष्टात आणले.
अन्य एका सामन्यात ईजिप्तच्या माझेन हेशामविरुध्द पहिला गेममध्ये बाजी मारुन आघाडीवर असलेल्या हरिंदरपाल सिंग संधूला कामगिरीत सातत्य राखता आले नाही. यानंतर हेशामने आक्रमक खेळ करुन सलग तीन गेम जिंकताना संधूला ५-११, ११-५, ११-८, ११-५ असे नमवले. (क्रीडा प्रतिनिधी)