दक्षिण आफ्रिका ७ बाद २६७
By admin | Published: January 15, 2016 02:23 AM2016-01-15T02:23:08+5:302016-01-15T02:23:08+5:30
स्टिवन फिन, बेन स्टोक्स, स्टुअर्ट ब्रॉड व मोईन अली यांच्या गोलंदाजीच्या जोरावर इंग्लंडने तिसऱ्या कसोटी सामन्यात गुरुवारी पहिल्या दिवशी दक्षिण आफ्रिका संघाला
जोहान्सबर्ग : स्टिवन फिन, बेन स्टोक्स, स्टुअर्ट ब्रॉड व मोईन अली यांच्या गोलंदाजीच्या जोरावर इंग्लंडने तिसऱ्या कसोटी सामन्यात गुरुवारी पहिल्या दिवशी दक्षिण आफ्रिका संघाला ७ बाद २६७ धावांवर रोखले.
दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एबी डिव्हिलियर्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या डीन एल्गरने सर्वाधिक ४६ धावा केल्या. त्याने १२२ चेंडूंत संयमी फलंदाजी करीत ५ चौकारांसह ही धावसंख्या उभी केली. त्यानंतर एबी डिव्हिलियर्सने ४० चेंडूंत ४ चौकार व एका षटकारासह ३६ धावा केल्या. विकेटकीपर डेन विलासने ३८ चेंडूंत ४ चौकारांसह २६ धावांचे योगदान दिले. विलास आऊट झाल्यानंतर क्रिस मॉरिसने एक बाजू सांभाळत नेली. त्याने ५० चेंडूंत ४ चौकारांसह नाबाद २६ धावा केल्या. गॅगीसो रबादाने २० धावा करत चांगली साथ दिली. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा क्रिस मॉरिस २६ व रबादा २० धावांवर खेळत होते.
तत्पूर्वी, ढगाळ वातावरण आणि खेळपट्टीकडून मदत मिळत असल्यामुळे पहिल्या सत्रात वेगवान गोलंदाजांनी वर्चस्व गाजवले. दक्षिण आफ्रिकेची सलामीची जोडी वान जिल व डीन एल्गर यांना सुरुवातीला स्टीव्हन फिनच्या भेदक माऱ्याला सामोरे जावे लागले. या दोघांनी सलामीला ४४ धावांची भागीदारी केली. त्यानंतर इंग्लंडच्या कर्णधाराने गोलंदाजीसाठी स्टोक्सला पाचारण केले. त्याने तिसऱ्याच चेंडूवर इंग्लंडला यश मिळवून दिले. स्टोक्सच्या आखूड टप्प्याच्या चेंडूवर जिलने आॅफ साईडला खेळण्याचा प्रयत्न केला; पण चेंडू जिलच्या बॅटला चाटून यष्टिरक्षक जॉनी बेयरस्टाच्या ग्लोव्ह्जमध्ये विसावला. (वृत्तसंस्था)