दक्षिण आफ्रिकेचा अफगाणिस्तानवर ३७ धावांनी विजय
By Admin | Published: March 20, 2016 04:50 PM2016-03-20T16:50:25+5:302016-03-20T18:31:38+5:30
आयसीसी टी-२० वर्ल्डकपमध्ये अखेर दक्षिण आफ्रिकेने आपले विजयाचे खाते उघडले आहे. दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तावर ३७ धावांनी विजय मिळवला.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २० - आयसीसी टी-२० वर्ल्डकपमध्ये अखेर दक्षिण आफ्रिकेने आपले विजयाचे खाते उघडले आहे. दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तावर ३७ धावांनी विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेच्या धावसंख्येचा पाठलाग करतान अफगाणिस्तानचा डाव १७२ धावांवर संपुष्टात आला.
दक्षिण आफ्रिकेने निर्धारीत वीस षटकात पाच बाद २०९ धावा केल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेच्या २१० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सलामीवीर मोहोम्मद शहजादने १९ चेंडूत ४४ धावा फटकावून दमदार सुरुवात करुन दिली होती. मात्र नंतर आलेल्या फलंदाजांना तसेच सातत्य टिकवता न आल्याने अफगाणिस्तानचा पराभव झाला. मात्र नवख्या अफगाणिस्तानने या सामन्यात चांगली लढत दिली.
शहजाद व्यतिरिक्त सलामीवीर नूर अली झादरान २५, गुलबदीन २६ आणि शेनवारीने २५ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेच्या २१० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना नवख्या अफगाणिस्ताननेही दमदार सुरुवात केली होती अफगाणिस्तानने दहा षटकात १०० धावांचा टप्पा पार केला होता.
सलामीवीर मोहोम्मद शहजादने १९ चेंडूत ४४ धावा फटकावून दमदार सुरुवात करुन दिली. पहिल्या २२ चेंडूत अफगाणिस्तानच्या ५० धावा फलकावर लागल्या. पहिल्या विकेटसाठी मोहोम्मद शहजाद आणि नूर अली झादरानने ५२ धावांची सलामी दिली.
शहजादला ४४ धावांवर मॉरिसने बाद केले. त्यानंतर कर्णधार असगर स्टानिकझायही लवकर बाद झाला. त्याने ७ धावा केल्या. १०५ धावांवर गुलबदीनच्या रुपाने अफगाणिस्तानला तिसरा धक्का बसला. त्याने २६ धावा केल्या. त्याने नूर अली बरोबर तिस-या विकेटसाठी ४५ धावांची भागीदारी केली. दक्षिण आफ्रिकेचा मॉरिस सर्वाधिक यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने चार षटकात २७ धावा देत चार गडी बाद केले.
स्फोटक फलंदाज एबी डिविलियर्सच्या २९ चेंडूतील ६४ धावांच्या खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने टी-२० वर्ल्डकपच्या सलग दुस-या सामन्यात २०० धावांचा टप्पा ओलांडला. दक्षिण आफ्रिकेने निर्धारीत वीस षटकात पाच बाद २०९ धावा केल्या.
अफगाणिस्तानला विजयासाठी २१० धावांचे लक्ष्य दिले होते. डिविलियर्सने डावाच्या १६ व्या षटकात २९ धावा वसूल केल्या. डिविलियर्सला ६४ धावांवर मोहोम्मद नाबीने बाद केले. सलामीवीर क्विंटन डिकॉक ४५, ड्यु प्लेसिस ४१ आणि डयुमिनीच्या नाबाद २९ धावा केल्या. पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला इंग्लंड विरुद्ध २२५ पेक्षा जास्त धाव करुनही विजय मिळवता आला नव्हता.