दक्षिण अफ्रिकेने उडवला धुव्वा, ऑस्ट्रेलिया फक्त 85 धावांत ऑल आऊट
By admin | Published: November 12, 2016 10:55 AM2016-11-12T10:55:43+5:302016-11-12T10:55:43+5:30
दक्षिण अफ्रिकेने यजमान ऑस्ट्रेलिया संघाला दुस-या कसोटी सामन्याच्या पहिल्या सत्रात फक्त 85 धावांवर ऑल आऊट केलं आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
हॉबर्ट (ऑस्ट्रेलिया), दि. 12 - ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिकेदरम्यान दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. पहिल्या कसोटी सामन्यात पराभव केल्यानंतर दक्षिण अफ्रिकेने आपला पराक्रम कायम ठेवत दुस-या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाची दाणादाण उडवली आहे. दक्षिण अफ्रिकेने यजमान ऑस्ट्रेलिया संघाला पहिल्या सत्रात फक्त 85 धावांवर ऑल आऊट केलं आहे. लंचअगोदरच दक्षिण अफ्रिकेने फक्त 43 धावांवर ऑस्टेलियाचे सहा गडी बाद केले होते. यानंतर 42 धावांत राहिलेल्या 4 विकेट्स घेत दक्षिण अफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवला.
दक्षिण अफ्रिकेकडून फिलेंडरने सर्वोत्तम प्रदर्शन करत 21 धावांमध्ये 5 विकेट्स घेतल्या. याव्यतिरिक्त काइली अबॉटने 41 धावा देत 3 विकेट्स घेतल्या.
पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण अफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचा 177 धावांनी पराभव केला आहे. दुस-या कसोटी सामन्यातही ऑस्ट्रेलियावर पराभवाचं संकट दिसत आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये ऑस्ट्रेलिया संघाला दक्षिण अफ्रिकेकडून चांगलाच धोबीपछाड मिळत असल्याचं दिसत आहे. 2011 साली केपटाऊनमध्ये दक्षिण अफ्रिकेने ऑस्ट्रेलिया संघाला फक्त 47 धावांत गारद केलं होतं, तर गतवर्षी 2106 मध्ये नोटींघ्घम येथे 60 धावांमध्ये संपुर्ण संघाला तंबूत पाठवलं होतं. हे दोन्ही सामने देशाबाहेर झाल्याने ऑस्ट्रेलिया संघाची तेवढी अब्रू वाचली होती. मात्र यावेळी घरच्याच मैदानावर दक्षिण अफ्रिकेने त्यांचं वस्त्रहरण केलं आहे, त्यामुळे हा सामना जिंकण्याची जबाबदारी ऑस्ट्रेलिया संघाच्या खांद्यावर आहे.