दक्षिण आफ्रिका भारतीय युथ ब्रिगेडविरुद्ध विजयासाठी उत्सुक
By Admin | Published: September 29, 2015 12:07 AM2015-09-29T00:07:28+5:302015-09-29T00:07:28+5:30
युवा व अनुभवी खेळाडूंचा समावेश असलेला दक्षिण आफ्रिकेचा टी-२० संघ ७२ दिवसांच्या भारत दौऱ्याची सुरुवात मंगळवारी भारत ‘अ’ संघाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या टी-२० सराव सामन्याने करणार आहे.
नवी दिल्ली : युवा व अनुभवी खेळाडूंचा समावेश असलेला दक्षिण आफ्रिकेचा टी-२० संघ ७२ दिवसांच्या भारत दौऱ्याची सुरुवात मंगळवारी भारत ‘अ’ संघाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या टी-२० सराव सामन्याने करणार आहे.
फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखालील दक्षिण आफ्रिका संघासाठी ही लढत म्हणजे भारतीय वातावरणासोबत जुळवून घेण्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. मनदीप सिंगच्या नेतृत्वाखालील भारत ‘अ’ संघाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या या लढतीनंतर दक्षिण आफ्रिका संघाला २ आॅक्टोबरला धर्मशाला येथे महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाविरुद्ध पहिला टी-२० सामना खेळायचा आहे.
दक्षिण आफ्रिका संघात कर्णधार फाफ डू प्लेसिस, कसोटी कर्णधार हाशिम अमला, वन-डे कर्णधार एबी डिव्हिलियर्स, लेगस्पिनर इम्रान ताहिर आणि सीनिअर फलंदाज जेपी ड्युमिनी या सीनिअर खेळाडूंचा समावेश आहे. डेव्हिड मिलर व क्विंटन डीकॉक या टी-२० स्पेशालिस्ट फलंदाजांच्या समावेशामुळे दक्षिण आफ्रिका संघ मजबूत झाला आहे.
पालम एअरफोर्स मैदानाचा आकार बघता डिव्हिलियर्स, डु प्लेसिस आणि मिलर यांच्याकडून आक्रमक खेळीची आशा आहे. डेल स्टेन व मोर्नी मोर्केल यांच्या अनुपस्थितीतही दक्षिण आफ्रिका संघाची गोलंदाजीची बाजू मजबूत आहे. एल्बी मोर्केल, ख्रिस मॉरिस, ताहिर आणि केली एबोट टी-२० क्रिकेटमध्ये चांगले गोलंदाज आहेत. त्यांनी आयपीएलमध्ये आपला ठसा उमटवला आहे.
यजमान भारतीय बोर्ड अध्यक्ष इलेव्हन तसे बघता भारताचा ‘क’ दर्जाचा संघ आहे. कारण भारत ‘अ’ संघ बंगळुरूमध्ये बांगलादेश ‘अ’ संघाविरुद्ध तीनदिवसीय सामन्यात सहभागी झाला आहे.
दक्षिण आफ्रिका संघाच्या आव्हानाला सामोरे जाण्यास सज्ज असलेल्या भारताच्या युवा संघातील खेळाडूंनी आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. या संघातील एकही खेळाडू सीनिअर संघात स्थान मिळविण्याच्या शर्यतीत नाही, पण पाच महिन्यांनंतर होणाऱ्या आयसीसी टी-२० विश्वकप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर त्यांना निवड समितीचे लक्ष वेधण्याची चांगली संधी प्राप्त झाली आहे. फिरकीपटू यजुवेंद्र चहल, पवन नेगी आणि कुलदीप यादव मिळालेल्या संधीचा लाभ घेण्यास उत्सुक आहेत. कारण आर. आश्विनचा अपवाद वगळता टी-२० क्रिकेटमध्ये कुठल्याही फिरकीपटूचे भारतीय संघातील स्थान निश्चित नाही. फलंदाजीमध्ये मयंक अग्रवालने अलीकडेच भारत ‘अ’ संघातर्फे चमकदार कामगिरी केली होती. मनन व्होरा याला आयपीएल आणि सैयद मुश्ताक अली चषक स्पर्धेत यापूर्वी खेळल्या गेलेल्या १० टी-२० सामन्यांमध्ये ४० पेक्षा अधिक धावा फटकावता आलेल्या नाहीत. मनीष पांडे आणि संजू सॅम्सन दक्षिण आफ्रिकेच्या दिग्गज गोलंदाजांविरुद्ध धावा फटकावण्यास उत्सुक आहेत. (वृत्तसंस्था)
प्रतिस्पर्धी संघ
भारत बोर्ड अध्यक्ष इलेव्हन : मनदीप सिंग (कर्णधार), मयंक अग्रवाल, मनन व्होरा, मनीष पांडे, सूर्यकुमार यादव, संजू सॅम्सन, हार्दिक पंड्या, ऋषी धवन, अनुरित सिंग, यजुवेंद्र चहल, पवन नेगी, कुलदीप यादव.
दक्षिण आफ्रिका टी-२० संघ :- फाफ डू प्लेसिस (कर्णधार), हाशिम अमला, फरहान बेहार्डियेन, क्विंटन डीकॉक, मर्चेंट डी लांगे, एबी डिव्हिलियर्स, जेपी ड्युमिनी, इम्रान ताहिर, एडी एल, केली एबोट, डेव्हिड मिलर, ख्रिस मॉरिस, कागिसो रबाडा, एल्बी मोर्केल, खाया जोंडो.