दक्षिण आफ्रिका ‘अ’ची शानदार सुरुवात
By admin | Published: August 18, 2015 10:46 PM2015-08-18T22:46:11+5:302015-08-18T22:46:11+5:30
मधल्या फळीतील फलंदाज ओम्पिलो रामेलाचे शतक व आघाडीच्या फळीतील फलंदाजांनी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाच्या जोरावर दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाने
वायनाड : मधल्या फळीतील फलंदाज ओम्पिलो रामेलाचे शतक व आघाडीच्या फळीतील फलंदाजांनी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाच्या जोरावर दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाने आजपासून प्रारंभ झालेल्या पहिल्या चारदिवसीय अनधिकृत कसोटी सामन्यात दिवसअखेर ४ बाद २९३ धावांची मजल मारली. दिवसअखेर बाद होण्यापूर्वी रामेलाने ११२ धावांची खेळी केली.
सलामीवीर रिजा हेंड्रिक्स (५०) आणि तांबे बावुमा (नाबाद ५५) यांनीही अर्धशतके झळकावली. रामेला व बावुमा यांनी चौथ्या विकेटसाठी १३६ धावांची महत्त्वाची भागीदारी केली. पहिल्या
दिवसाचा खेळ थांबला त्या वेळी बावुमाला दुसऱ्या टोकाकडून नाईट वॉचमन डेन पीट खाते न उघडता साथ देत होता.
आघाडीचे काही खेळाडू सीनिअर संघात सामील झाल्यामुळे कमकुवत झालेल्या भारत ‘अ’ संघाच्या गोलंदाजांना छाप पाडता आली नाही. फिरकीपटू अक्षर पटेल आतापर्यंत सर्वांत यशस्वी गोलंदाज ठरला आहे. त्याने ५२ धावांच्या मोबदल्यात २ बळी घेतले. जयंत यादव व ईश्वर पांडे यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणाऱ्या दक्षिण आफ्रिका संघाने कृष्णागिरी स्टेडियमच्या फलंदाजीसाठी अनुकूल खेळपट्टीवर शानदार सुरुवात केली. हेंड्रिक्स व स्टीयान वान जिल (२८) यांनी सलामीला ६० धावांची भागीदारी केली. आॅफस्पिनर जयंत यादवने वान जिलला माघारी परतवत भारताला पहिले यश मिळवून दिले. वैयक्तिक अर्धशतक झळकावल्यानंतर हेंड्रिक्स ईश्वर पांडेचे लक्ष्य ठरला. त्या वेळी दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाची २ बाद १०० अशी स्थिती होती. हेंड्रिक्सने अर्धशतकी खेळी ७ चौकार व २ षटकारांनी सजवली.
त्यानंतर रामेलाने डाव सावरला. त्याने थेनिस डी ब्रुएनच्या (३८) साथीने तिसऱ्या विकेटसाठी ५७ धावांची भागीदारी केली. रामेलाने पांडेच्या गोलंदाजीवर षटकार वसूल करीत प्रथमश्रेणी क्रिकेटमधील पाचवे शतक पूर्ण केले. दिवसाच्या ८८ व्या षटकात पटेलने रामेलाला माघारी परतवले. रामेलाने शतकी खेळीत १२ चौकार व ३ षटकार मारले. (वृत्तसंस्था)