दक्षिण आफ्रिका ‘रनआऊट’; १९१ धावांत ढेपाळले

By admin | Published: June 12, 2017 01:04 AM2017-06-12T01:04:55+5:302017-06-12T01:04:55+5:30

भारताविरुद्ध नेहमीच चांगली कामगिरी करणारा हाशिम अमला आणि डिकॉक भारतीय गोलंदाजांच्या अचूक टप्प्यावरील गोलंदाजीसमोर अपेक्षित धावगतीने धावा करूशकले नाहीत

South Africa 'Runout'; Chasing 191 runs | दक्षिण आफ्रिका ‘रनआऊट’; १९१ धावांत ढेपाळले

दक्षिण आफ्रिका ‘रनआऊट’; १९१ धावांत ढेपाळले

Next

भारताविरुद्ध नेहमीच चांगली कामगिरी करणारा हाशिम अमला आणि डिकॉक भारतीय गोलंदाजांच्या अचूक टप्प्यावरील गोलंदाजीसमोर अपेक्षित धावगतीने धावा करूशकले नाहीत. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला ५0 धावांपर्यंत पोहोचण्यासाठी १३ व्या षटकापर्यंत प्रतीक्षा करावी लागली.
 अमला आणि डिकॉक यांनी दबाव हटवण्याचा प्रयत्न केला. अमला आक्रमक पवित्रा अवलंबण्याच्या परिस्थितीत असतानाच त्याला अश्विनने १८ व्या षटकांत तंबूत धाडले. अमलाने कटचा फटका खेळण्यास थोडा उशीर केला आणि चेंडू बॅटला लागून महेंद्रसिंग धोनीच्या ग्लोव्हजमध्ये विसावला. अमलाने ५४ चेंडूंत ३ चौकार व एक षटकार मारला. डिकॉक आणि फाफ डुप्लेसिस यांनी स्ट्राईक रोटेट करीत धावा घेतल्या. त्यामुळे २२ व्या षटकांत संघाची धावसंख्या तिहेरी आकड्यात पोहोचली.
डिकॉकने ६८ व्या चेंडूंत त्याचे १४ वे वनडे अर्धशतक पूर्ण केले; परंतु जडेजाला पुढील षटकात स्वीपचा फटका खेळणे त्याला महागात पडले. पहिल्याच चेंडूवर जडेजाचे पायचीतचे अपील पंचांनी फेटाळून लावले; परंतु या डावखुऱ्या फिरकी गोलंदाजाने पुढील चेंडूवर डिकॉकला त्रिफळाबाद करीत तंबूत धाडले. डिकॉकच्या ७२ चेंडूंच्या खेळीत ४ चौकारांचा समावेश आहे.
 आधीच्या २ सामन्यांत ४ आणि 0 धावांवर बाद होणारा अ‍ॅबी डिव्हिलियर्स (१६) पुन्हा एकदा मोठी खेळी करू शकला नाही. डुप्लेसीसने त्याला धाव घेण्यासाठी आवाज दिला आणि तो त्याला रोखू शकला नाही. त्याने स्वत:च्या अंदाजात सूर मारत स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला; परंतु त्याआधी हार्दिक पंड्याचा थ्रो धोनीपर्यंत पोहोचला होता. डुप्लेसिसने नंतर डेव्हिड मिलर (१) यालादेखील धावबाद केले. डुप्लेसिस चेंडूला कट करून धाव घेण्यासाठी धावला; परंतु तो पुन्हा क्रिजमध्ये परतला. तोपर्यंत मिलरदेखील त्याच्या एंडला पोहोचला होता. स्वत: डुप्लेसिस मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. हार्दिक पंड्याच्या सुरेख चेंडूंवर पुढे खेळण्याच्या प्रयत्नात तो त्रिफळाबाद होऊन तंबूत परतला.
 बुमराहने त्यानंतर फुलटॉसवर एंडिल फिलकुवायो (४) याला पायचीत केले. भुवनेश्वरने कॅगिसो रबादा आणि मोर्ने मॉर्कलला सलग चेंडूवर बाद केले तर इम्रान ताहीर धावबाद होणारा तिसरा फलंदाज ठरला. जेपी ड्युमिनी २0 धावांवर नाबाद राहिला.

Web Title: South Africa 'Runout'; Chasing 191 runs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.