दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाचा धावांचा डोंगर
By admin | Published: August 19, 2015 11:08 PM2015-08-19T23:08:53+5:302015-08-19T23:08:53+5:30
ओम्पिलो रामेला (११२) याच्या शतकानंतर क्वांटन डिकॉकच्या (११३) शतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने बुधवारी अनधिकृत कसोटीच्या दुसऱ्या दिवशी ५४२ धावांचा डोंगर
पुणे : ओम्पिलो रामेला (११२) याच्या शतकानंतर क्वांटन डिकॉकच्या (११३) शतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने बुधवारी अनधिकृत कसोटीच्या दुसऱ्या दिवशी ५४२ धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना भारताचा डाव मात्र गडगडला. दिवसभराचा खेळ संपला, तेव्हा भारताने ३ गडी गमावून १२२ धावा केल्या होत्या.
दक्षिण आफ्रिकेचा नाईट वॉचमन डेन पीट याने भारतीय गोलंदाजांची सत्त्वपरीक्षा पाहिली. दुसऱ्या बाजूने डिकॉकने आक्रमक फलंदाजी सुरू ठेवली होती. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी ७८ धावांची
भागीदारी केली. पीट १६ धावा काढून बाद झाला. त्यानंतर डिकॉक याने डेन विलास याला बरोबर
घेऊन भारतीय गोलंदाजांचा समाचार घेणे सुरूच ठेवले. तिरंगी मालिकेत दोन्ही सामन्यांत शतक झळकावणाऱ्या डिकॉकने आपली कामगिरी तशीच सुरू ठेवली. बदली गोलंदाज ईश्वर पांडे याच्या गोलंदाजीवर तो बाद झाला. त्याने १३ चौकार व ३ षटकारांच्या साह्याने शतक झळकावले.
डेन विलास यानेही तुफानी फलंदाजी करून ७४ चेंडूंत १० चौकार व २ षटकारांच्या साह्याने ७५ धावा केल्या. या दोघांची भागीदारी संपुष्टात आल्यानंतर मात्र आफ्रिकेचा डाव गडगडला. त्यांचे ४ फलंदाज ५० धावांतच बाद झाले. केशवमहाराज याने १९ धावा केल्या. भारताकडून अक्षर पटेलने ११५ धावांत ४ बळी मिळविले. अय्यर व जयंत यादव यांनी प्रत्येकी २, तर मिथुन व पांडे यांनी प्रत्येकी १ बळी मिळविला.
प्रत्युत्तरादाखल उतरलेल्या भारतीय संघांची सुरुवात मात्र काहीशी डळमळीत झाली. जीवनज्योतसिंग व अभिनव मुकुंद यांनी पहिल्या विकेटसाठी ४३ धावांची भागीदारी केली. जीवनज्योतने ३९ चेंडूंत ३ चौकारांच्या साह्याने २२ धावा केल्या. अभिनव मुकुंद याने ७५ चेंडूंत ६ चौकारांच्या साह्याने ३९ धावा केल्या. अय्यरने आज आत्मविश्वासपूर्वक खेळी केली. मात्र, त्याचे अर्धशतक एका धावेने हुकले. त्याने ६१ चेंडूंत ४९ धावा केल्या. भारत ‘अ’ अजून दक्षिण आफ्रिका ‘अ’पेक्षा ४२० धावांनी
मागे आहे.( वृत्तसंस्था)