दक्षिण आफ्रिकेचा मालिका विजय

By admin | Published: November 16, 2016 12:12 AM2016-11-16T00:12:01+5:302016-11-16T00:12:01+5:30

दक्षिण आफ्रिकेने मंगळवारी चौथ्या दिवशी संपलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात आॅस्ट्रेलियाचा एक डाव व ८० धावांनी पराभव करीत आॅस्ट्रेलियात सलग तिसऱ्यांदा मालिका विजय साकारला.

South Africa win series | दक्षिण आफ्रिकेचा मालिका विजय

दक्षिण आफ्रिकेचा मालिका विजय

Next

होबार्ट : दक्षिण आफ्रिकेने मंगळवारी चौथ्या दिवशी संपलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात आॅस्ट्रेलियाचा एक डाव व ८० धावांनी पराभव करीत आॅस्ट्रेलियात सलग तिसऱ्यांदा मालिका विजय साकारला.
दक्षिण आफ्रिकेने चौथ्या दिवशी उपाहारापूर्वी आॅस्ट्रेलियाचा डाव १६१ धावांत गुंडाळत सहज विजय नोंदवला. आॅस्ट्रेलियाचा पहिला डाव केवळ ८५ धावांत संपुष्टात आला होता. आज आॅस्ट्रेलियाने अखेरच्या ८ विकेट ११६ चेंडूंमध्ये ३२ धावांच्या मोबदल्यात गमावल्या. पर्थमध्ये पहिल्या कसोटी सामन्यात १७७ धावांनी विजय मिळवणाऱ्या दक्षिण आफ्रिकेने १९८० ते १९९० च्या दशकातील विंडीज संघासोबत बरोबरी साधली. विंडीजने त्या वेळी आॅस्ट्रेलियात सलग तीन कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला होता.
आॅस्ट्रेलियाचा हा कसोटी सामन्यातील सलग पाचवा पराभव ठरला. यापूर्वी आॅगस्टमध्ये आॅस्ट्रेलियाने श्रीलंकेत सलग तीन कसोटी सामने गमावले होते. आजच्या पराभवामुळे प्रशिक्षक डॅरेन लेहमन व कर्णधार स्टिव्हन स्मिथ यांच्यावरील दडपण वाढले आहे.
आॅस्ट्रेलियाचे फलंदाज पुन्हा एकदा काएल एबोट (६-७७) आणि कागिसो रबाडा (४-३४) यांच्या माऱ्याविरुद्ध सपशेल अपयशी ठरले.
२ बाद १२१ धावसंख्येवरून आॅस्ट्रेलियाने पुढे खेळण्यास सुरुवात केली. चौथ्या दिवशीच्या सुरुवातीच्या २० मिनिटांच्या खेळामध्ये आॅस्ट्रेलियाने उस्मान ख्वाजाची (६४) विकेट गमावली. त्यानंतर त्यांचा डाव गडगडला. एबोटच्या गोलंदाजीवर कटचा फटका मारण्याच्या प्रयत्नात ख्वाजा यष्टिरक्षक क्विंटन डिकाककडे झेल देत माघारी परतला. त्याने स्मिथच्या साथीने ५० धावांची भागीदारी केली. फॉर्मात नसलेला अ‍ॅडम व्होजेस (२) एबोटच्या गोलंदाजीवर गलीमध्ये तैनात जेपी ड्युमिनीकडे झेल देत माघारी परतला. कॅलम फर्ग्युसन केवळ एक धाव काढून रबाडाच्या गोलंदाजीवर बाद झाला. रबाडाने त्यानंतर यष्टिरक्षक पीटर नेव्हिल (६) व जो मनी (०) यांना तंबूचा मार्ग दाखवला. स्मिथला (३१) रबाडाने यष्टिरक्षकाकडे झेल देण्यास भाग पाडले. एबोटने त्यानंतर मिशेल स्टार्क (००) आणि नॅथन लियोन (४) यांना बाद करीत दक्षिण आफ्रिकेला विजयावर शिक्कामोर्तब करून दिले. (वृत्तसंस्था)

Web Title: South Africa win series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.